मशिदीवरील भोंग्यांना उत्तर देण्यासाठी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या मनसेच्या उपक्रमाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. स्वतः राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून ते हनुमा चालीसा पठणात सहभागी होणार आहेत. गुढीपाडव्याला झालेली सभा आणि त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेतून मनसेने भोंग्याच्या मुद्द्यावरुन थेट शिवसेना-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता यात भर पडली आहे ती बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनीही आपल्या घरी हनुमान चालीसा वाचावी नाहीतर मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचू असं थेट आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं आहे.
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मी आणि खासदार नवनीत राणा उद्या अमरावतीच्या पगडीवाले हनुमान मंदिरात चालीसा म्हणणार आहोत. सकाळी 9 ते 11 या वेळेत आम्ही ही हनुमान चालीसा वाचू आणि मंदिरावर भोंगेही लावू. ज्या मंदिरात हनुमान चालीसा वाचली जाताना भोंगा नाहीये तिकडेही मी भोंगे द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरेंनी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीत हनुमान चालीसा वाचली पाहिजे. बाळासाहेबांचे विचार त्यांनी जागृत करायला हवेत. जर ते हनुमान चालीसा वाचणार नसतील तर त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे असं म्हणावं लागेल. त्यांनी जर हनुमान चालीसा वाचली नाही तर मी आणि खासदार राणा हनुमान जयंतीनंतर मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचू. बाळासाहेबांच्या विचाराचं उद्धव ठाकरेंना विसर पडला आहे त्याची आठवण करुन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
आमदार रवी राणा – बडनेरा मतदारसंघ
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अखंड हिंदुस्थानाबद्दल केलेल्या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रीया देत भागवतांचं समर्थन केलं. “मोहन भागवत गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या हिताची कामं करत आहेत. अखंड भारत व्हावा ही संघाची इच्छा आहे आणि आम्हीही त्यांचं समर्थन करतो. भारताचा एकही अंग आमच्यापासून वेगळा नाही राहीला पाहिजे. या कामात आमची जिथे गरज लागेल तिकडे आम्ही त्यांच्यासोबत काम करु.” त्यामुळे आगामी काळात हनुमान चालीसा आणि भोंग्याचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT