नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे राज्यातील मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. आज मुंबईत पंकजा मुंडे आपल्या नाराज समर्थकांशी चर्चा करणार आहे. पत्रकार परीषद घेऊन पंकजा मुंडे यांनी आम्ही कोणत्याही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती असं स्पष्टीकरण दिलं होतं. परंतू समर्थकांच्या नाराजीनाट्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचं दिसतंय. अशातच पंकजा मुंडे वेगळा विचार करणार का अशी चर्चा सुरु होती, परंतू भाजप नेत्यांनी ही फेटाळून लावली आहे.
ADVERTISEMENT
“पंकजा मुंडे यांचं कोणतंही दबावतंत्र नाही. त्या असं कधीही करत नाहीत आणि करणार ही नाहीत. कधीकधी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आक्रोश होतो, त्याला पक्षद्रोह मानण्याचं काहीच कारण नाही. मंत्रीपदावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे यात फारकाही चर्चा करण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रीया आशिष शेलार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
भागवत कराड वर्षभरापूर्वी खासदार होऊन त्यांना मंत्रीपद देण्यात आलं, पण प्रीतम मुंडे यांना ते नाकारण्यात आलं. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे. पण ज्यावेळी आपल्या घरातही जेव्हा एखादा निर्णय आपल्याला योग्य वाटत नाही त्यावेळी आपण घराच्या प्रमुखाकडे याबद्दल नाराजी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते आहेत. ते सध्या प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर नाराजी येणं स्वाभाविक आहे. पण पंकजा ताई असा कोणताही वेगळा निर्णय घेतली असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रीया भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT