वाझेला सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव होता; परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट

दिव्येश सिंह

• 11:59 AM • 02 Feb 2022

मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाब टाकला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस […]

Mumbaitak
follow google news

मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाब टाकला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केला आहे.

हे वाचलं का?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला दिलेल्या जबाबात हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझेला पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी आपल्यावर थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाब होता. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या,’ असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझेला पुन्हा सेवेत सामावून घेण्याबद्दल विचारणा करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी हे उत्तर दिलं आहे.

परमबीर सिंग यांनी जबाबात काय म्हटलंय?

‘सचिन वाझेला जून 2020 मध्ये आढावा बैठक झाल्यानंतर पुन्हा नियुक्त करण्यात आलं होतं. काही सह आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सदस्य असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने आढावा घेतला होता. सर्व निलंबित प्रकरणाचा ही समिती आढावा घेत असते.’

‘सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याची कारणं आढावा समितीच्या फाईलमध्ये आहेत. तरीही मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाब होता. तसेच मला आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते’, असं परमबीर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

गुन्हे शाखेत नियुक्तीचीही सूचना

‘मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत वाझेची नियुक्ती करण्याची तसेच महत्त्वाच्या युनिटची जबाबदारी त्याच्याकडे देण्याची सूचनाही मला देण्यात आली होती. सचिन वाझेच्या नेतृत्वाखालील गुन्हे गुप्तवार्ता (CIU) विभागाकडे काही महत्त्वाची प्रकरण सोपवण्याची सूचनाही मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) आणि गृहमंत्र्यांनी (अनिल देशमुख) दिल्या होत्या,’ असं परमबीर यांनी यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

‘सचिन वाझेला पुढील कारवाई आणि सूचना देण्यासंदर्भात दोघांकडून (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख) थेट बोलवलं जायचं. यालाच जोडून मी हे सांगू इच्छितो की, पुन्हा सेवेत घेण्यासाठी आणि नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी सचिन वाझेकडे 2 कोटी रुपये मागितले होते. सचिन वाझेनेच मला हे सांगितलं होतं,’ असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे.

    follow whatsapp