ऐन सणासुदीच्या काळात गॅससह महागाईचा भडका उडालेला असतानाच आता पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दराचं बोट धरत डिझेलच्या किमतीही लिटरमागे शंभरीवर पोहोचल्या आहेत. देशातील चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून इंधनाचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
तेल वितरक कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढून लिटरमागे 103.54 रुपयांवर पोहोचले आहेत, तर डिझेलही 35 पैशांनी वाढून 92.12 पैशांवर गेले आहेत.
मुंबईत पेट्रोलच्या दरात 29 पैशांची वाढ झाली असून लिटरमागे भाव 109.54 रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दरही 37 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत डिझेलसाठी लिटरमागे 99.92 रुपये मोजावे लागत आहेत.
कोलकातामध्ये पेट्रोल 104.23 रुपये लिटर गेलं असून, डिझेलचे दर 95.23 प्रतिलिटरवर गेले आहेत. तर चेन्नईत पेट्रोलचे दर 101.01 रुपयांवर पोहोचले आहेत, तर डिझेल 96 रुपये झाले आहेत.
देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पलिकडे पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरासह सर्वच राज्यांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे.
महागाईवरून आरबीआयच्या भूमिकेकडे लक्ष
रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीला बुधवारपासून सुरुवात झाली. बैठकीतील निर्णय गव्हर्नर शक्तिकांता दास आज जाहीर करणार आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाई दरात किंचित घट झाली.
जुलैमधील ५.५९ टक्क्यांच्या महागाई दर ऑगस्ट महिन्यात ५.३० टक्क्यांवर राहिल्याने, रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील सहा टक्क्यांखाली राहणे काहीसे दिलासादायी आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या खनिज तेलाच्या किमतीमुळे देशांतर्गत इंधनाच्या किमतीही वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT