मुंबई आणि पुण्यात १५वी आयपीएल स्पर्धा खेळवली जात असून, आयपीएलच्या सामन्यांवर सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सट्टेबाजांचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी ३ बुकींना अटक करण्यात आली असून, २५ लाखांच्या रोख रकमेसह ७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड परिसरातून आयपीएल सामन्यादरम्यान सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी काळेवाडी परिसरातील वैभव पॅराडाईज नावाच्या इमारतीत काही लोक आयपीएल सामन्यांवर बेकायदेशीरपणे सट्टा लावत असल्याची माहिती कळल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुंड विरोधी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या.
त्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि गुंड विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी त्यांच्या पथकाने वैभव पॅराडाईज नावाच्या इमारतीत छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून ३ बुकींना ताब्यात घेतलं.
चौकशीनंतर हे बुकी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात ७ मोबाईल फोन आणि सुमारे २५ लाखांची रोकड जप्त केली.
काळेवाडी पिंपरी येथे राहणारा सनी गिल (वय ४०), पिंपरी येथील सुभाष अग्रवाल (वय ५७), रितिक खेमचंदानी (वय ३६) अशी या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यातील इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT