भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण २.३३ कोटींची संपत्ती आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत २६ लाख रूपयांची वाढ झाली आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे गांधीनगरमध्ये जमीन होती ती त्यांनी दान केली. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या नावे कुठलीही स्थावर मालमत्ता नाही.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे कार किंवा म्युच्युअल फंड नाही
पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीचं विवरण देण्यात आलं आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जी संपत्ती आहे त्यातली बहुतांश बँकेत जमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणतेही बाँड, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स नाहीत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे कोणती कारही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या वर्षी पर्यंत २.२३ कोटी संपत्ती होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ३१ मार्च २०२१ पर्यंत २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रूपये संपत्ती होती. ३१ मार्च २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणतीही नव्याने संपत्ती नव्हती. मात्र आता त्यांची संपत्ती २ कोटी ३३ लाख रूपये झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ३५ हजार २५० रूपये रोख आहेत तर त्यांच्या नावे १८९३०५ रूपयांची लाइफ इन्शुरन्स पॉलिसीही आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ऑक्टोबर २००२ मध्ये गांधीनगरमधला एक निवासी भूखंड अन्य तीन मालकांसह संयुक्तपणे विकत घेतला होता. या भूखंडात चारही जणांचा समान वाटा होता. सर्व्हे क्रमांक ४०१/A या भूखंडात नरेंद्र मोदी यांच्या नावे जो २५ टक्के वाटा होता तो त्यांनी दान केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारी मंत्र्यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या आपल्या मालमत्तांचाही तपशील जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे २.५४ कोटींची जंगम तर २.९७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. माजी मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT