शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केलीये. पोहरादेवी गडावरील महंतांना बंजारा समाज मानतो. याच महंतांना आपल्या बाजूनं वळवण्यात ठाकरेंना यश आलंय. महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी संजय राठोडांचा शह करण्याचे संकेतही दिलेत.
ADVERTISEMENT
पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी (३० सप्टेंबर) मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक उपस्थित होते.
महंत सुनील महाराजांना संजय राठोडांविरुद्ध देणार उमेदवारी?
महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, संजय राठोडांविरुद्ध निवडणूक लढवणार का? याला उत्तर देताना महंत सुनील महाराज म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हा निर्णय घेतील.’
संजय राठोडांच्या मुळावरच उद्धव ठाकरे घालणार घाव, शिवसेनेचा मोठा प्लॅन फुटला
याच प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, ‘आपण म्हणतो, साधू संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा. नवरात्रीमध्ये सुनील महाराज शिवसेनेत आलेत. केवळ ते एकटेच आलेले नाहीत. तर बंजारा समाजातला कडवट, लढवय्या सैनिकही आलाय. आम्ही त्यांना (संजय राठोड) न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा या सर्वांच्या लक्षात आलं की, ज्यांनी न्याय दिला. त्यांच्याच पाठीत वार केला. त्यांच्यासोबत (संजय राठोडांसोबत) आपण जाऊ शकत नाही. कारण सेवालाल महाराजाचा शिष्य असलेल्या बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाहीये. ते निष्ठेने शिवसेनेत आलेत. त्यांचं भविष्य घडवणं ही माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी पूर्णपणे घेतलीये. लवकरात लवकर मी महाराष्ट्रात फिरेनं. पोहरादेवीलाही जाईन’, असं ठाकरे म्हणाले.
जेव्हा ठाकरेंना महंत सुनील महाराजांना शिवसेनेत प्रवेश देऊन संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न होतोय का? असं विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शह देणं या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही. मला पुढे जायचं आहे. जे सोबत येतील, ते माझे आहेत. लढायच्या वेळी जे सोबत येतात, त्यांचं महत्त्व अधिक असतं. त्यामुळे एवढा मोठा समाज सोबत आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला शह देणं शुल्लक गोष्ट आहे’, असं ठाकरे म्हणाले.
संजय राठोडांना शह देण्याच्या मुद्द्यावर थेट उत्तर देणं ठाकरेंनी टाळलं. पण, महंत सुनील महाराज यांना राठोडांविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते, याचे संकेतही दिलेत. ‘त्यांचं भविष्य घडवणं ही माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी पूर्णपणे घेतलीये’, असं ठाकरे म्हणालेत. त्यामुळे राठोडांविरुद्ध महंत सुनील महाराज यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर ठाकरेंचं दुसरं विधान म्हणजे ‘एवढा मोठा समाज सोबत आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला शह देणं शुल्लक गोष्ट आहे’, असंही ठाकरे म्हणालेत. त्यामुळे ठाकरेंनी स्पष्ट म्हटलेलं नसलं, तरी राठोडांना शह देण्याचे संकेत ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे दिलेत.
ADVERTISEMENT