या वर्षीच्या सुरूवातीलाच एक घटना पुण्यात घडली होती. ती होती एका टिकटॉक स्टारची आत्महत्या. होय पुण्यातल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा शोध अद्यापही सुरू आहे. या प्रकरणाची चर्चा राज्यात सुरू झाली त्यानंतर तीन दिवसातच बारा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या क्लिप्स पूजा चव्हाणच्या फोनवर होत्या. या क्लिप्समधला आवाज हा माजी वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पूजा चव्हाणच्या फोनवरील विविध ऑडिओ रेकॉर्डिंगमधून राठोड आणि पूजा चव्हाण यांच्या घनिष्ठ संबंध असल्याचं स्पष्ट होतं आहे. मात्र आता हे सगळं प्रकरण दुसरीकडे वळवलं जातं आहे असा आरोप होतो आहे.
ADVERTISEMENT
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासात पोलीस महासंचालकांनी लक्ष घालावं अशी मागणी केली होती. पुणे पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी शंकाही उपस्थित केल्या होत्या. ७ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. त्यानंतर 21 दिवसांनी म्हणजेच 28 फेब्रुवारीला वनमंत्री संजय राठोड यांना त्यांचं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. त्याआधी संजय राठोड बराच काळ नॉट रिचेबलही होते. इंडिया टुडेने यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
संजय राठोड यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मी पूजा चव्हाणला ओळखत होतो मात्र जे आरोप होत आहेत त्याला अर्थ नाही. या प्रकरणात मी तपासाला सहकार्य करतो आहे असं संजय राठोड यांनी सांगितलं असतं तर त्यामध्ये पारदर्शकता राहिली असती. मात्र तसं झालेलं नाही. पोलीसही याबाबत ठोस अशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे हे सगळं प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतो आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
पोलीस सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राठोड यांची चौकशी झाली आहे. मात्र त्यांचा सहकारी अरूण राठोड याने सगळा दोष स्वतःवर घेतला आहे. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी सांगितले आहे की पूजा आणि अरूण राठोड गर्भपात करण्यासाठी रूग्णालयात आले होते. गर्भपात झाल्यानंतर पूजासंदर्भातली सगळी कागदपत्रं रूग्णालयाने अरूण राठोडला दिली होती.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी आरोप झाल्यानंतर पोहरादेवी या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करूनही संजय राठोड यांना त्यांचं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे १२ ते 13 ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या क्लिप्समधला आवाज कुणाचा आहे हे ओळखण्यासाठी त्या पुणे पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्सकडेही पाठवल्या होत्या. मात्र संजय राठोड यांचा आवाज सँपल म्हणून पाठवला आहे का? हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. संजय राठोड यांनी कायमच ही बाब मान्य केली आहे की मी पूजा चव्हाणला ओळखतो, आता या क्लिप्समधला आवाज आणि ते संभाषण पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यामधलंच आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्या ऑडिओ क्लिपबद्दल चित्रा वाघ यांनी काय म्हटलं आहे?
पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामधला आवाज हा संजय राठोड यांचाच आवाज आहे असा आरोप भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे.
ऑडीओ क्लिपमध्ये नेमकं आहे तरी काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तरुणीच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचं सांगत आहे. ज्यावर दुसरी व्यक्ती तिला समजावून सांगा…डॉक्टरकडे घेऊन जा असं सांगताना ऐकायला येतंय. यानंतर फोनवरील दुसरी व्यक्ती ही संबंधित व्यक्तीला, तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाऊन येते पण नंतर मी आत्महत्या करेन असं तरुणी म्हणत असल्याचं सांगताना ऐकायला येतंय.
दरम्यान या दोन्ही व्यक्तींमध्ये बंजारा भाषेतील संवादाची एक ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली असून ज्यात तरुणीने आत्महत्या केल्यानंतर एक व्यक्ती तिकडेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील व्यक्ती तिचा मोबाईल काढून घे असं सांगताना ऐकायला येत आहे.
ADVERTISEMENT