मुंबई तक ‘राज ठाकरे जिंदबाद’ म्हणत उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राणी पद्मावती युथ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. एकीकडे राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंग हे मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येच राज ठाकरे जिंदाबादचे पोस्टर्स लावण्यात आल्याने उत्तर प्रदेश भाजपमध्येच दोन मतं पाहण्यास मिळत आहेत. यापूर्वी देखील भाजपचे अयोध्या मतदारसंघाचे खासदार लल्लू सिंग यांनी देखील राज यांच्या दौऱ्याचं समर्थन केलं होतं.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे कैसरगंज मतदारसंघाचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत राज्यभर सभा घ्यायला सुरुवात केली आहे. २००८ मध्ये उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या लोकांच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यावेळी त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली होती. गरोदर स्त्रियांचाही विचार त्यावेळी करण्यात आला नाही. अशा सगळ्या कारणांमुळे आधी उत्तर प्रदेशच्या लोकांची राज ठाकरेंनी माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका बृजभूषण यांनी घेतली आहे.
लखनऊमध्ये विविध ठिकाणी राज ठाकरेंच्या समर्थनात पोस्टर्स
एकीकडे बृजभूषण यांनी हे आव्हान दिलेलं असताना, आता राज यांच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशची राणी पद्मावती युथ ब्रिगेड पुढे आली आहे. या ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमधे जागोजागी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत. या पोस्टर्सवर लिहण्यात आले आहे की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि युवकांचे आदर्श राज ठाकरे अयोध्येला रामाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांसह जाणार आहोत, आपण देखील या! असा उल्लेख करत चलो लखनऊचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर या पोस्टर्सच्यावरील भागात ‘राज ठाकरे जिंदाबाद’ असं देखील लिहिण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT