महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे हे परळीत एकाच मंचावर होते, मात्र त्यांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. तसंच दोघांनी चर्चाही केली नाही. मात्र भाषणात या दोघांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. राज्याच्या राजकारणात मुंडे बंधू-भगिनी यांच्यात असलेलं राजकीय वैर कायमच चर्चेत असतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी परळीत विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता.
ADVERTISEMENT
परळीतल्या एका कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे एकाच मंचावर होते. मात्र त्यांनी एकमेकांडे ढुंकूनही पाहिलं नाही. सोमवारी झालेल्या कार्यक्रमाची आता परळीत चर्चा सुरू झाली आहे. कारण एकमेकांकडे दुर्लक्ष करणारे हे बंधू-भगिनी भाषणाला उभे राहिल्यावर मात्र त्यांची टोलेबाजी ऐकण्यास मिळाली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे परळीत नव्हत्या त्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. प्रीतम मुंडे कार्यक्रमाला आल्या. धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे एकाच मंचावर होते. पण दोघांमध्ये काहीच संवाद झाला नाही. दोघांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही.
बीड जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली. या प्रसंगी बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यक्रमात येण्यास वेळ लागला. त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता हा टोला लगावला.
आता प्रीतम मुंडेंना उत्तर देणार नाहीत ते धनंजय मुंडे कसले? ‘मी पाहिलेलं परळीच्या विकासाचं स्वप्न आमि तुम्ही पाहिलेलं परळीच्या विकासाचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. स्वप्न साकार करायची असतील तर पाया पक्का असावा लागतो. हा पाया पक्का करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आमच्या ताईंना यायला उशीर झाला असावा असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं.
शाब्दिक जुगलबंदी
या कार्यक्रमात दोघा मुंडे बंधू-भगिनीची भाषणातून चांगलीच जुगलबंदी दिसून आली. प्रीतम मुंडे यांना या कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाला. त्यावेळी परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था सांगत खासदार मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या शहरात संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल टीका केली. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील खासदार प्रीतम मुंडे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. परळीचा पायाभूत विकास सुरु आहे, त्यामुळे आमच्या ताईला इथे पोहोचण्यास उशीर झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले.
ADVERTISEMENT