एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे हे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले असताना तिथे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी कऱण्यात आली. भीमशक्ती रिपब्लिक सेनेने यावेळी समीर वानखेडे चैत्यभूमीवर आल्याने आक्षेप घेतला. आज 6 डिसेंबर असल्याने म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने आंबेडकरांच्या अनुयायांची गर्दी सकाळपासूनच चैत्यभूमीवर झाली होती. समीर वानखेडे देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी गेले. मात्र त्यांना विरोध करण्यात आला.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे भीमशक्ती रिपब्लिक सेनेने?
भीमशक्ती रिपब्लिक सेनेने अध्यक्ष दगडू कांबळे यांनी समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला आहे. ‘समीर वानखेडेंना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. शिकलेल्या लोकांनीच मला धोका दिला आणि हाल केले असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. समीर वानखेडे यांना आजच चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली?’ असा प्रश्नही दगडू कांबळे यांनी विचारला आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
‘बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे. अभिवादन करणं एखाद्या धर्माचं, समाजाचं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही येथे दरवर्षी येतो. काही लोकांनी येणं सुरू केलं हे चांगलं आहे. मी जो संघर्ष सुरू केला, त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरू झाला आहे असं वाटतं.’ असं नवाब मलिक म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही समीर वानखेडेंना पाहिलंत का? त्यावर ते म्हणाले चैत्यभूमीवर ते आले की नाही माहित नाही. पण माझ्यासोबत ते नमाज पठण करायचे हे खरं आहे असं नवाब मलिक म्हणाले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमीवर अभिवादन केलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर सकाळी चैत्यभूमवीर दाखल झाले होते. यानंतर गेल्या काही काळापासून वादात असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेदेखील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना घोषणाबाजी झाल्याने वाद निर्माण झाला.
ADVERTISEMENT