टीईटी पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेक मोठी नावे पुढे आली आहेत. यामध्ये आता तुकाराम सुपेचा चालक सुनील खंडू घोलप आणि दिल्ली येथून आशुतोष शर्मा या दोघांचा देखील पेपर फुटीमध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ज्यानंतर पुणे पोलिसांनी या दोघांनाही अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
ADVERTISEMENT
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण पाच परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोने चांदीचे दागिने, ५ कोटी रक्कम या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. तसेच या कारवाईच्या सुरूवातीला परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्याकडून तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत असताना आम्ही त्यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारा सुनील खंडू घोलप यालाचौकशी करीता ताब्यात घेतलं होतं. त्या चौकशीमध्ये विद्यार्थ्यांना पेपर पुरवण्यात घोलपचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून दिल्ली येथून आशुतोष शर्मा याला देखील पेपर फुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT