पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध एका २४ वर्षीय मुलीने बलात्कार करुन जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात कुचिक यांनी कोर्टातून अटकपूर्व जामिन मिळवल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
बलात्कारी कुचिकला पुणे पोलिसांची साथ मिळत आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हेच आरोपीला थेट मदत करत असल्याचा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला. १६ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुणे पोलिसांनी कारवाई केली नाही. ज्यामुळे आरोपीला जामीन मिळवण्यासाठी वेळ मिळाला. वेळकाढूपणा करुन पुणे पोलिसांनी आरोपीला एकाप्रकारे मदतच केली असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
राजकीय गुन्ह्यांमध्ये पुणे पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या. जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पीडित मुलगी सगळीकडे जाऊन आली पण तिला कोणीही न्याय दिला नाही. त्यामुळे पवार साहेबांनीच यात लक्ष घालावं अशी विनंती वाघ यांनी केली. त्या पुणे भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
जाणून घ्या काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणीची ६ नोव्हेंबर २०२० मध्ये फेसबूकवर ओळख झाली. १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत दोघेही एकमेकांशी बोलत होते. या ओळखीचं रुपांत प्रेमात झालं. यानंतर डॉ. कुचिक यांनी तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून शिवाजीनगर आणि अन्य ठिकाणी नेऊन शारिरिक संबंध ठेवले. तरुणी गरोदर राहिल्यानंतर कुचिक यांनी पीडित तरुणीला गर्भपात करायला भाग पाडून याबद्दल कुठेही बोलल्यास तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली.
रघुनाथ कुचिक यांनी काय दिलं होतं स्पष्टीकरण?
डॉ. कुचिक यांनी या प्रकरणात प्रतिक्रीया देताना बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचं डॉ. कुचिक यांनी सांगितलं. २४ वर्षीय तरुणीने आपल्याला फेसबूकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. ओळख वाढल्यानंतर या तरुणीनेच प्रेम संबंधांसाठी पुढाकार घेतला. कालांतराने या तरुणीने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत करारनामा पाठवला. ज्यात तिच्या नावावर एक फ्लॅट, दर महिन्याला १५ हजार रुपये, हे महिने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला जमा करायचे यात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ करायची असं नमूद केल्याचं डॉ. कुचिक यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT