राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेऊन पुन्हा उभारी घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला इतर पक्षांकडून होणारा विरोध अजुनही कमी होताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सोडून विरोधी पक्षांची मोट बांधण्याची गरज असल्याचं विधान केलं होतं. यामध्ये आता तेलंगणा राष्ट्र समितीचीही भर पडली आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष हीच भाजपची खरी ताकद असल्याचं उपहासात्मक विधान TRS नेते के.टी. रामा राव यांनी केलं आहे.
काँग्रेस पक्ष हा आता कमजोर झाला असून त्यांच्यामुळेच दिवसेंदिवस भाजप देशात सशक्त होत चालला आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष हीच भाजपची खरी ताकद असल्याचं विधान रामा राव यांनी केलं आहे. काँग्रेसमुळेच भाजप दिवसेंदिवस देशात शक्तीशाली होत चालल्याचं रामा राव म्हणाले.
प्रशांत किशोर यांच्या Indian Political Action Committee [I-PAC] या संस्थेने नुकतच तेलंगणा राष्ट्र समितीसोबत करार केला आहे. आगामी 2023 विधानसभा निवडणुकीसाठी I-PAC संस्था चंद्रशेखर राव यांच्यासोबत काम करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान I-PAC संस्था ही स्वतंत्रपणे काम करत राहिलं असं सांगितलं होतं. प्रशांत किशोर हे सध्याच्या घडीला I-PAC या संस्थेशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्यामुळे I-PAC चं तेलंगणा राष्ट्र समितीसोबत काम करणं सध्यातरी काँग्रेससाठी फारसं चिंताजनक नसणार आहे. परंतू इतर विरोधी पक्षांचं मन वळणं यासाठी काँग्रेसला आगामी काळात काम करावं लागणार असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT