वाढती महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजना या मुद्द्यांवरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीसह देशभर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढत्या महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “लोकशाहीची जी हत्या होत आहे, त्याविषयी काय वाटत आहे. देशाने ७० वर्षात लोकशाही बनवली, ती ८ वर्षात मिटली. आज देशात लोकशाही राहिलेली नाही. आज भारतात चार लोकांची हुकुमशाही आहे. आम्ही महगाई, बेरोजगारीचे मुद्द्यांवर आवाज उठवू इच्छितो, पण आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही,’ असं राहुल गांधी म्हणाले.
“लोकशाहीची हत्या होत असल्याचं भारत बघत आहे. आपल्या सर्वांसमोर हे होतंय. जो कुणी या हुकुमशाहीविरोधात उभं राहू पाहतोय. त्याला अटक केली जातेय. त्याला मारलं जात आहे. महागाई, मुद्दे उपस्थित केले जाऊ दिले जात नाहीयेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
विरोधकांच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जाताहेत; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“विरोधी पक्ष देशातील स्वायत्त संस्थांच्या बळावर विरोधक लढत असतात. पण या सर्वच संस्थावर आज सरकारने आपले लोक बसवून ठेवले आहेत. प्रत्येक संस्थांमध्ये आरएसएसची माणसं आहेत. जेव्हा आमचं सरकार होतं. तेव्हा आम्ही ते नियंत्रित करत नव्हतो. त्यामुळे आज जर कुणी दुसऱ्या पक्षाला समर्थन देत असेल, तर त्याच्याविरोधात ईडी, इतर चौकशा लावल्या जातात, त्यामुळे विरोधक उभे राहत आहेत. पण हवा तितका प्रभाव टाकू शकत नाहीये,” अशी टीका राहुल गांधींनी केली.
मोदी सरकार म्हणतंय हे खरं नाही; कोविड मृतांच्या आकड्यावरून राहुल गांधींची टीका
“वास्तव वेगळं आहे आणि दाखवलं वेगळं जातंय. स्टार्ट अप इंडिया आज कुठे आहे. स्टार्ट अप इंडिया आज लोकांना रस्त्यावर आणत आहे. कोविड काळात कुणीही मेले नाहीत, असं सरकार सांगत आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगतेय की ५ कोटी लोक मेले आहेत. तर सरकार सांगतंय की हे खरं नाही. बेरोजगारी वाढत आहे, सरकार म्हणतंय हे खरं नाही. महागाई वाढतेय अर्थमंत्री म्हणतात, हे खरं नाही,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून सुरू होणार आहे. त्यानंतर काँग्रेसचा कार्यकर्ते ११ वाजता संसद भवन ते राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाणार आहे. काँग्रेसने राष्ट्रपतींनी भेटीसाठी वेळ मागितलेली असून, अद्याप राष्ट्रपतीकडून वेळ मिळालेली नाही.
ADVERTISEMENT