Rahul Gandhi vs Narendra Modi: अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले 20 हजार कोटी रुपये त्यांचे नाहीत. प्रश्न हाच आहे की, ते 20 हजार कोटी रुपये कुणाचे?, असा रोकडा सवाल करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनाही सवाल केला.
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “भारतात लोकशाहीवर आक्रमण होत आहे, हे मी वारंवार बोललो आहे. याची दररोज उदाहरण दिसत आहेत. मी एकच प्रश्न विचारला होता. अदाणींची शेल कंपन्या आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपये गुंतवले. तो पैसा अदाणींचा नाहीये. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा उद्योग आहे आणि पैसा दुसऱ्याचा आहे. प्रश्न हा आहे की 20 हजार कोटी कुणाचे आहेत?”, असा प्रश्न राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
वाचा – Rahul Gandhi Disqualified: सोनिया, इंदिरा गांधींनाही गमवावी लागली होती खासदारकी, काय घडलं होतं?
राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी संसदेत पुरावे दिले. अदाणी-मोदींमधील संबंधाबद्दल बोललो. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून दोघांचे संबंध आहेत. त्यांच्यासोबत मोदी विमानात बसलेले होते. मी लोकसभा अध्यक्षांना मुद्देसूद पत्र लिहिले आणि नियम बदलून विमानतळे दिल्याचे सांगितले. त्यांना काहीही फरक पडला नाही.”
लोकसभा अध्यक्षांना चिठ्ठ्या लिहिल्या, भेटलो; राहुल गांधींचा बिर्लावरही निशाणा
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “मंत्री माझ्याबद्दल संसदेत खोटं बोलले. मी परदेशी शक्तींकडे मदत मागितल्याचे सांगितले. मी लोकसभा अध्यक्षांना सांगितले की, संसदेचा नियम आहे की, जेव्हा खासदारावर आरोप होतात. तेव्हा त्याला उत्तर देण्याचा अधिकार असतो. मी चिठ्ठी लिहिली, त्याचं उत्तर आलं नाही. दुसरी चिठ्ठी लिहिली, त्याचंही उत्तर आलं नाही. मी लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात गेलो आणि म्हणालो की, हा कायदा आहे आणि नियम आहे. खोटा आरोप लावलेला आहे आणि तुम्ही मला का बोलू देत नाही आहात?”
“मी त्यांना घाबरत नाही”, राहुल गांधींचा इशारा
“ते हसले आणि म्हणाले की, मी ते करू शकत नाही. त्यानंतर काय झाले हे तुम्ही सगळ्यांनी बघितले. मी प्रश्न विचारत राहणार. नरेंद्र मोदींचा अदाणींसोबत काय नाते आहे आणि 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? मी विचारत राहणार, मी यांना घाबरत नाही. ते जर असा विचार करत असतील की, माझी खासदारकी रद्द करून, धमकावून, तुरुंगातून टाकून थांबवू शकतात, तर तसं होणार नाही. माझा तो इतिहास नाहीये”, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
वाचा – राहुल गांधींना झालेली शिक्षा हेच अधोरेखित करतेय; न्यायालयाच्या निकालानंतर पवारांनी व्यक्त केली चिंता
राहुल गांधी पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की, “मी भारतातल्या लोकशाहीसाठी लढत आहे. मी लढत राहीन. मी कुणालाही घाबरत नाही. विरोधकांसमोर एकच पर्याय आहे लोकांमध्ये जाणे. या देशाने मला प्रेम दिलं, आदर दिला, त्यामुळे मी हे देशासाठी करत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
ADVERTISEMENT