मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांना बाबासाहेब पुरंदरे आणि इतर विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांना पूरस्थिती आणि मुसळधार पाऊस याबाबत तसंच मुंबईत पाणी तुंबतं त्याबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की सरकार कोणतंही येओ नियोजनाचा अभाव हा कायमचा आहे. चिपळूण, महाड या ठिकाणी दरवर्षी पाऊस पडतो, पूर येतो. तिथल्या लोकांसाठी आधीच नियोजन करायला नको का? मुंबईत दहा बारा जागा अशा आहेत जिथे 30-40 लोक एकत्र येऊन मुतले तरीही पाणी तुंबेल. मग याला काय नियोजन म्हणायचं का? अशा शब्दात सरकारचा समाचार घेतला आहे. दरवेळी ढिसाळ नियोजनाचा फटका हा नागरिकांना बसतो आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पूर परिस्थिती उद्भवते तेव्हा परदेशात कसं तंत्रज्ञान कसं विकसित केलं गेलं आहे याचा अभ्यास सरकारमधल्या लोकांनी करायला हवा असंही राज ठाकरेंनी सुनावलं आहे. परदेशात जेव्हा अशा प्रकारे परिस्थिती उद्भवणार असते तेव्हा सात-आठ तास आधीच सायरन वाजतात. तिथले लोक सुरक्षित स्थळी त्यांचं स्थलांतर केलं जातं. आपल्याकडे दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते मग आपण नियोजन करायला कधी शिकणार आहोत? विकासाच्या गप्पा मारल्या जातात, मात्र शहरांच्या नियोजनांचं काय? ते झालं नाही की अशा गोष्टी होणारच असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मागच्या आठवड्यात पावसाने मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढलं. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठलं होतं. त्यातून वाट काढताना लोकांना नाकी नऊ आले होते. अशात मुंबईबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत दहा बारा जागा अशा आहेत जिथे तीस चाळीस लोक एकत्र येऊन मुतले तरीही पाणी तुंबतं. असं म्हणत मुंबई महापालिकेच्या नियोजनावर राज ठाकरेंनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत टीका केली आहे.
परप्रांतीयाबाबत माझी भूमिका महाराष्ट्र हिताचीच
परप्रांतीयांबाबतची माझी भूमिका स्पष्ट आणि महाराष्ट्र हिताची आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांना भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांना हेही विचारण्यात आलं की फडणवीस म्हणत आहेत की परप्रांतीयाबाबत काही भूमिका स्पष्ट केली राज ठाकरेंनी तर युतीचा विचार करू. या प्रश्नावर आता राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
मी आजपर्यंत भाषणात परप्रांतीयांबाबत मांडलेल्या मांडलेल्या भूमिका या स्पष्ट आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. बैल मुतत जातो तशा मी भूमिका बदलत नाही. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही हे सरळ आहे. तुम्ही आता आसाम आणि मिझोरमचा प्रश्न पाहिला तर तिथेही हेच चाललं आहे. मूळ असे प्रश्न निर्माण का होतात याची चर्चा होणं आवश्यक आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा सरळ विरोध मी केला आहे. ज्या भूमिका घेतल्या, ज्या पटल्या त्याचं मी समर्थनही केलं आहे. यात काही चुकीचं नाही. मला छक्के पंजे करायला आवडत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT