दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ६२ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. प्रकृती बिघडल्यानं त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचं निधन झालं.
ADVERTISEMENT
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून राकेश झुनझुनवालांनी प्रचंड संपत्ती जमवली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आकासा एअरलाइन्स ही हवाई प्रवासी वाहतूक कंपनी सुरू केली. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी झाला होता. त्यांनी चॉर्टड अकाऊंटंटपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर गुंतवणूकदार म्हणून शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवलं होतं.
५ हजारापासून केली सुरूवात, ४३.३९ कोटींचे मालक
राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूक अगदी ५ हजार रुपयांपासून सुरू केली होती. राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा गुंतवणुकीस सुरुवात केली. ५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा नफा कमावला होता.
राकेश झुनझुनवाला यांनी टाटा टी चे शेअर ४३ रुपयाने खरेदी केले होते. तीन महिन्यातच त्यांनी प्रति शेअर १४३ रुपये या भावाने विकले होते. त्यातून राकेश झुनझुनवाला तिप्पट नफा झाला होता. टायटन, स्टार हेल्थ, मेट्रो ब्रॅण्ड, टाटा मोटर्स, क्रिसील या कंपन्यांमध्ये त्यांची सर्वाधिक गुंतवणूक आहे.
राकेश झुनझुनवालांनी चित्रपटांची निर्मितीही केली
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणुकीबरोबरच चित्रपट निर्मितीही केली. श्रीदेवीची मुख्य भूमिका असलेला इंग्लिश विंग्लिश, शमिताभ आणि की अॅण्ड का या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.
राकेश झुनझुनवाला यांनी लॉन्च केली आकासा
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी हवाई प्रवासी वाहतूक क्षेत्रात नुकतचं पाऊल ठेवलं होतं. त्यांनी आकासा एअरलाइन्स सुरू केली होती. आकासाचं पहिलं विमान विमानं ७ ऑगस्ट रोजी झेपावलं.
आकासा एअरलाइन्स कंपनीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेख यांची आहे. दोघांची एकूण ४५.९७ टक्के भागीदारी आहे. त्यांच्याबरोबर विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भटकुली, पीएआर कॅपिटल व्हेंचर्स, कार्तिक वर्मा हे आकासा एअर लाइन्सचे प्रमोटर्स आहेत.
ADVERTISEMENT