उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून दूर गेलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी दापोलीतल्या सभेत मातोश्रीवर हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंपासून ते भास्कर जाधवांपर्यंत सर्वांवर रामदास कदमांनी पलटवार केला. २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल झालेल्या घटनाक्रमांबद्दल रामदास कदमांनी काही दावे केले. यात रश्मी ठाकरेंचा नामोल्लेख टाळत कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
ADVERTISEMENT
शिव संवाद यात्रेला योगेश कदमांनी दापोलीत सभा घेऊन प्रत्युत्तर दिलं. याच सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदावरून गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असं सांगितलं आणि नंतर एका रात्रीत काय झालं? असा सवालही केला.
याच सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचं नाव न घेता स्फोटक विधान केलंय. पत्नीच्या दबावामुळे मुख्यमंत्री झाले, कारण त्यांच्या पत्नीला वर्षा बंगल्यावर जायचं होतं, असा उल्लेख रामदास कदमांनी केलाय.
एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांचा तोल सुटला, म्हणाले…
रामदास कदम नक्की काय म्हणाले?
दापोलीतल्या सभेत बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘महाविकास आघाडीसंदर्भात बैठक झाली मढच्या हॉटेलमध्ये. त्या बैठकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, हा शिवसैनिक, याला मला मुख्यमंत्री बनवायचं. मला नाही बनायचं. मग एका रात्रीत काय घडलं? रात्री बारा संजय राऊत शरद पवारांच्या घरी गेले. माझी बायको ओरडतेय. डोकं आपटून घेते. तिला वर्षावर जायचं आहे. ती मला सांगतेय की तूच मुख्यमंत्री हो. झालं. गडी एका रात्रीत बाशिंग बांधून तयार झाला.’
‘एकनाथ शिंदेंच्या फसवणुकीचा मी साक्षीदार आहे’
‘एकनाथ शिंदेंना वाटलं आपण मुख्यमंत्री आहोत आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार बैठकीमध्ये उठले आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं. विश्वासघात, महापाप ज्याला म्हणतो. एकनाथ शिंदेंना कसं फसवलं, याचा मी साक्षीदार आहे’, असा दावा रामदास कदमांनी केलाय.
Ramdas Kadam : ‘अरे आदित्य खरा गद्दार तू आहेस, काका म्हणून पाठीत खंजीर खुपसला’
‘मातोश्रीची पायरी आता कधीच चढणार नाही’; उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
‘जे शिवसेनाप्रमुखांनी कमावलं, ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. सगळं संपून टाकलं सगळं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय झाला. शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीवर होती. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा विषय आला. त्यावेळी मी उद्धवजींना सांगितलं की, शिवसेनाप्रमुखांनी अख्खं आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात घालवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करून शिवसेना उभी केली. त्यांच्यासोबत संसार मांडू नका. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. ऐकलं नाही तिथून उठून आलो. तेव्हापासून आजपर्यंत मातोश्रीची पायरी चढलो नाही आणि आता कधीच चढणार नाही’, असंही रामदास कदम या सभेत म्हणालेत.
शिवसेना काय उत्तर देणार?
दापोलीतल्या सभेत रामदास कदम, भरत गोगावले, उदय सामंत, योगेश कदम आदी नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीलाच लक्ष्य केलं. रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना गद्दार संबोधलं, तर उद्धव ठाकरे यांना विश्वासघातकी. शिंदे गटातील या नेत्यांकडून झालेल्या टीकेला आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबरोबरच शिवसेनेचे नेते काय उत्तर देणार हे महत्त्वाचं.
ADVERTISEMENT