रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार असल्याची माहिती आहे. जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान गुवाहटीहून परत येताना शिंदेंसह सर्वांनी प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर शिंदे आणि सहाकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री, मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
ADVERTISEMENT
आता बंड यशस्वी झाल्याचा दावा करत एकनाथ शिंदे आणि सहकारी पुन्हा एकदा गुवाहटीला जाऊन कामाख्या देवीचा आशीर्वाद घेणार असल्याची माहिती आहे. त्यांचा हा दौरा नेमका कधी असणार हे अद्याप ठरलं नसलं तरी त्याबाबतची तारिख लवकरच जाहीर केली जाईल असं शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह या दौऱ्यावर जाण्यासाठी माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदमही इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आज खेड तालुक्यातील लोटे येथे बोलत होते. ते म्हणाले, मला बोलावलं तर मी देखील जाईन. गुवाहटीची देवी पावते असं मला कळलं आहे. कारण हे सगळे गुवाहटीला गेले नसते तर मंत्रिमंडळ झालं नसतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले नसते, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसता. म्हणजे इतकी चांगली जर देवी असेल तर जायला का नको? जायला हवं ना तिकडं असंही ते म्हणाले.
देसाई, परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा :
रामदास कदम यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, अनिल परबला लवकर आत टाकला पाहिजे, अजून का उशीर होतोय ते कळत नाही. उद्धावजींना असेच बडवे बाजूला लागतात. अनिल परब, कान चावणारा-कानात बोलणारा सुभाष देसाई आहे, विनायक राऊत अशीच माणसं त्यांना लागतात. हे बडवे जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत उद्धवजींचं काही खरं नाही, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT