–राकेश गुढेकर, रत्नागिरी
ADVERTISEMENT
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपली आहे. राज ठाकरेंच्या सभेला भाजपने पैसा पुरवल्याच्या खैरेंच्या आरोपाला उत्तर देताना दानवेंनी चिमटा काढला आहे. दानवेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेबद्दलही महत्त्वाचं विधान केलंय.
रावसाहेब दानवे यांनी रत्नागिरीतील भाजप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला भाजपने फंडिंग केल्याचा आरोप शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. खैरेंच्या या आरोपावर बोलताना रावसाहेब दानवेंनी वर्मावर बोट ठेवलंय. चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता रावसाहेब दानवे म्हणाले, “जो दिवा विझला, त्याला आगकाडी लावत नाही,” असं दानवे म्हणाले.
राज्यातील राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. महाविकास आघाडीबरोबर भाजपनंही तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहावी जागा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच आज दानवेंनी या जागेबद्दल मोठं विधान केलं. “आमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष यांच्यामुळे आम्ही तिसरी जागा सहज निवडून आणू शकतो. आम्हाला कोणाची कोंडी करायची नाही, पण शिवसेनेनं त्यांची मतं सांभाळावीत,” असं सूचक विधान दानवेंनी केलं.
संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी, शाहू छत्रपतींचा दावा
संभाजीराजेंचा अपमान कुणी केला?
संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल बोलताना दानवे म्हणाले, “मी राज्याचा अध्यक्ष असताना संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून राष्ट्रपती कोट्यातून उमेदवारी दिली. संभाजीराजे यांचा भाजपने सन्मान राखला. आता मला दिलेला शब्द शिवसेनेनं पाळला नाही असा संभाजीराजे यांनी आरोप केला आहे. राजेंचा हा अपमान कुणी केला हा निर्णय जनतेनं करावा. राजेंच्या गादीचा भाजपने नेहमीच सन्मानच केला आहे.”
जीएसटीच्या मुद्द्यावरून दानवेंनी राज्य सरकारला आव्हान दिलं. “राज्य केंद्र सरकारला किती पैसे देणे आहे आणि केंद्र सरकार राज्याला किती पैसे देणं आहे याचा हिशोब काढा. राज्य सरकारनं आमच्यासोबत बसून, आमच्या सोबत चर्चा करावी,” असं दानवे म्हणाले.
धनंजय महाडिक कोण आहेत?, भाजपने त्यांनाच उमेदवारी का दिलीये?
“राज्य सरकारकडून केंद्राला कोळशाचे तीन हजार कोटी, पाच हजार कोटी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियस कॉरिडॉर प्रकल्पाचं येणं आहे. तसेच मुंबई-अमदाबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राने आपला पैसा दिला. गुजरातने त्यांचा वाट्याचा पैसा दिला, मात्र आपल्या राज्याने करार झालेला असताना एक पैसा देखील दिला नाही. त्यामुळे राज्य सरकारसोबत आम्ही केव्हाही हिशेबाला बसायला तयार आहोत,” असं दानवे म्हणाले.
पंकजा मुंडेंबद्दल भाष्य…
पंकजा मुंडे यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “काही विषय पक्षाचे अंतर्गत विषय असतात. त्याची सामूहिक चर्चा होत नाही. पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यायची की नाही हा विषय आमचा पक्षाच्या बैठकीत चर्चेला घेऊ,” असं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT