बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या विधानावरून ठाकरेंकडून सातत्यानं मोदी आणि भाजपवर टीका करण्यात येते, तोच मुद्दा गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पोहोचला आहे. क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्विट केलाय. ‘अभी टाइम है गुजरातीयों’ म्हणत त्याने भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आज पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान होत असून, मतदानादरम्यान क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाने एक व्हिडीओ ट्विट केलाय. बाळासाहेब ठाकरे भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. हा जुना व्हिडीओ ट्विट करत जाडेजाने गुजरातमधील मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
‘मोदी गया तो गुजरात गया’
रविंद्र जाडेजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणताहेत की, माझं म्हणणं इतकंच आहे की, नरेंद्र मोदी गया, गुजरात गया. नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं, तर गुजरात गेला हे माझं वाक्य मी आडवाणीपाशी बोललेलो आहे,” असं या व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत.
मोदी-शहांच्या राज्यात ते शक्य आहे काय? ठाकरेंचा सवाल, कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी
हा व्हिडीओ ट्विट करत रविंद्र जाडेजाने भाजपला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलंय. व्हिडीओ ट्विट करताना रविंद्र जाडेजा म्हणतो, ‘अभी भी टाइम है समज जाओ गुजरातीयों.’
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ग्रोधा दंगल झाली होती. प्रचंड हिंसाचार घडला होता. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.
लालकृष्ण आडवाणी यासंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यास विरोध केला होता. नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही भाजपच्या हातून जाईल, असा सल्ला आडवाणींना दिला होता, असं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणात सांगायचे.
रविंद्र जाडेजाची पत्नी रीवाबा निवडणुकीच्या रिंगणात
गुजरात विधानसभा निवडणूक होत असून, यावेळी क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नीही निवडणूक लढवत आहे. जाडेजाची पत्नी रीवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. रीवाबा यांनी 2019 मध्ये भाजपत प्रवेश केला होता.
महत्त्वाचं म्हणजे रविंद्र जाडेजाची पत्नी आणि वडील हे काँग्रेसमध्ये असून, बहिणही निवडणूक लढवत आहे. रीवाबा जाडेजा निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघातून 2017 धर्मेंद्रसिंह जाडेजा निवडणूक जिंकले होते. यावेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलंय.
ADVERTISEMENT