2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया शिपवर छापा टाकून आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट यांच्यासह एकूण आठ जणांना NCB ने अटक केली. ड्रग्ज प्रकरणात ही कारवाई झाली तेव्हापासून हे प्रकरण चांगलंच गाजतं आहे. या प्रकरणाला रविवारी वेगळं वळण लागलं याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रभाकर साईल.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील पंच किरण गोसावी याने आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली होती. त्यातले आठ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे होते अशी चर्चा झाली होती असं प्रभाकर साईलने मीडियासमोर येऊन सांगितलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. यआाधी नवाब मलिक हे ncb च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतेच. त्यानंतर सोमवारी किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे दोघेही मीडियाच्या संपर्कात आले. पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढली आहे कारण तो एका फसवणुकीच्या प्रकरणात फरार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याला अटक करण्यासाठी काही पथकं लखनऊलाही गेली होती. आज हा किरण गोसावी मुंबई तकच्या कॅमेरासमोर अज्ञात स्थळावरून आला आहे. त्याच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज खेळकर यांनी. त्याने चर्चेत काय म्हटलं आहे वाचा सविस्तर-
NCB मध्ये तुम्ही पंच म्हणून होतात, मग तुम्ही आरोपींना नेताना-आणताना तुम्ही कसं दिसत आहात?
किरण गोसावी-आर्यन खान क्रूझवर घसरला होता तेव्हा तो मला म्हणला की सर मुझे हाईड कर दो. माझा चेहरा दाखवू नका. त्यामुळे मी त्याला घेऊन जाताना दिसतो आहे. मी कोर्टात गेलो नाही. त्या कारणासाठी लपवून त्याला मी घेऊन गेलो. काही सेकंदात या सगळ्या गोष्टी घडल्या.
आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी मागितले असा आरोप तुमच्यावर झाला आहे.. त्याबद्दल?
किरण गोसावी- मलाही हे परवाच समजलं आहे. मला याबद्दल काहीही माहित नाही. त्यामुळेच मी पुणे पोलिसांना सरेंडर होण्यासाठी आलो होतो. पण मला एनसीबीकडून फोन आला. त्यामुळे मी थांबलो आहे. तसंच इतरही काही लोक मला शोधत आहेत, त्यामुळे मला स्वतःला लपून रहावं लागतं आहे.
सॅम डिसूझा कोण आहे?
किरण गोसावी- 2 ऑक्टोबरला मी सॅम डिसूझाला भेटलो. माझा आणि त्याचा संपर्क मनिष भानुशालीने करून दिला होता. मनिष विचारत होता की तोपण क्रूझवर येऊ शकतो का? पण त्याला तिथे एंट्री मिळाली नाही. मी याआधी त्याला ओळखत नव्हतो. कोण कोण येणार आहेत? हे दाखवण्यासाठी आम्ही तिथे होते. बरेच लोक तिथे होते. एनसीबीचा २५- ३० लोकांचा स्टाफ होता.
आर्यन खान क्रूझवर कुठल्या स्थितीत होता?
किरण गोसावी- आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार आम्ही एकूण 27 नावं दिली होती. त्यातले सात जण पकडेल गेले. बाकीचे लोक तिथे आले नाहीत. ज्यांना आधीच समजलं होतं की रेड होणार आहे ते अर्ध्या रस्त्यातून निघून गेले. ही यादी मी एनसीबीकडे सबमिट केली आहे.
जे सात लोक अटकेत आहेत, बाकीचे वीस लोक कोण होते?
किरण गोसावी- मी ओळखत नाही, सत्तावीस जणांची यादी माझ्याकडे आली होती. त्यापैकी सात जण आले होते.
तुमची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का?
किरण गोसावी- मी सध्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये नाही, आधी काम करत होतो. आता आयात आणि निर्यातचा व्यवयास करतो तो चांगला चालतो आहे.
समीर वानखेडेंवर जे काही आरोप लागत आहेत त्याबद्दल?
किरण गोसावी- मला नीटसं माहित नाही. पण परवा मी जी प्रभाकर साईलची बातमी पाहिली त्यानंतर मला समोर येणं महत्त्वाचं वाटलं. खरंतर मला माझ्या जिवाचा धोका आहे. तरीही माझी प्रकरणं बाहेर काढली जात आहेत. एनसीबीने नोटीस दिली त्यालाही मी उत्तर देणार आहे.
नवाब मलिक जे आरोप समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत त्याबद्दल काय सांगाल?
किरण गोसावी- आधी काय घडलं ते मला माहित नाही. पण आत्ता म्हणजेच २ तारखेला जे घडलं ते माझ्यासमोर घडलं होतं. समीर वानखेडे यांना मी 2 ऑक्टोबरच्या आधी भेटलो नव्हतो. त्याआधी त्यांना टीव्हीवर पाहिलं होतं. तसंच एनसीबीच्या कोणत्याही आधीच्या केससाठी मी साक्षीदार नव्हतो किंवा त्यात माझी काहीही भूमिका नव्हती.
आणखी कोणत्या केसेसमध्ये पंच म्हणून गेला नाहीत का?
किरण गोसावी-गेल्या दोन वर्षांपासून मी पंच म्हणून काम करतो आहे. पण ते मुंबई पोलिसांसाठी जातो. गोमांसासंदर्भात काही बातम्या येतात किंवा इतर काही बातम्या येतात त्या आम्ही पोलिसांना कळवतो. त्याबदल्यात आम्हाला कोणताही मोबदला मिळत नाही.
आर्यन खानसोबत तुम्ही सेल्फी काढलात त्याचीही खूप चर्चा झाली, तो तुम्ही का काढलात?
किरण गोसावी– मी सेल्फी काढला तोपर्यंत मला माहित नव्हतं की आर्यन खानला अटक केली आहे. जस्ट तो बसला होता म्हणून मी सहज सेल्फी काढला. मी तो फोटो सोशल मीडियावरही टाकला नाही. तो प्रभाकर साईलच्या मोबाईलमध्ये काढला होता. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यामुळे तो फोटो त्यानेच व्हायरल केला असावा. जे व्हीडिओ आणि फोटो प्रभाकरने काढले तेच व्हायरल होत आहेत.
किरण गोसावीने मुंबई तकला हे सांगितलं आहे की जे काही सत्य आहे ते समोर येणार आहेच. आता तो पुण्यात शरण येण्यासाठी आला होता. मात्र एनसीबीने त्याला बोलवल्यामुळे तो मुंबईला जाणार आहे स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्यानंतर पुणे पोलिसांना शरण येणार आहे.
ADVERTISEMENT