Kolhapur Flood : पुराच्या पाण्यात अडकलेल्या २५-३० वानरांना मिळाला मदतीचा हात

मुंबई तक

• 03:11 PM • 26 Jul 2021

सलग ३-४ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पूरपरिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना या पावसाचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसला. पन्हाळा तालुक्यातील वाघवे परिसरात कासारी नदीच्या किनारी एका झाडावर २५-३० माकडं अडकून पडली होती. आजुबाजूला पाणी आणि खाण्यापिण्याचं काहीच साधन नसल्यामुळे या माकडांना वाचवण्याची जबाबदारी कोल्हापूर आणि बावडा […]

Mumbaitak
follow google news

सलग ३-४ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पूरपरिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं असताना या पावसाचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसला. पन्हाळा तालुक्यातील वाघवे परिसरात कासारी नदीच्या किनारी एका झाडावर २५-३० माकडं अडकून पडली होती. आजुबाजूला पाणी आणि खाण्यापिण्याचं काहीच साधन नसल्यामुळे या माकडांना वाचवण्याची जबाबदारी कोल्हापूर आणि बावडा रेस्क्यू टीमच्या लोकांनी घेतली.

हे वाचलं का?

कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी या रेस्क्यू टीमला एक बोट उपलब्ध करुन दिली. या रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचल्यावर माकडांच्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. सर्वात आधी या उपाशी वानरांना रेस्क्यू टीमने खाण्याचं अमिष दाखवत खाली आणण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्या झाडावर माकडं बसली होती ते झाड नदीपात्राला लागून असल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यातच काही पिल्ल ही माकडीणीच्या पोटाला बिलगून बसलेली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना बाहेर काढायला गेलं तर अनर्थ होऊ शकला असता.

त्यामुळे या रेस्क्यू टीममध्ये असलेल्या डॉ. वाळवेकर यांनी माकडांना बाहेर काढण्याऐवजी त्यांच्यासाठी रोप वे तयार करण्याची कल्पना सूचवली. यानंतर रेस्क्यू टीमने पाण्याचा अंदाज घेत एक मजबूत दोरखंड एका खांबाला बांधून या माकडांना झाडावरुन बाहेर येण्याची सोय करुन दिली. इतकच नव्हे तर माकडांना किमान ८ दिवस पुरेल एवढी केळी, पेरु आणि इतर फळं या दोरखंडावर आणि झाडावर बांधून ठेवण्यात आली. आपल्यासाठी काहीतरी चांगली सोय झाल्याचं लक्षात येताच माकडंही दोरखंडावर येऊन दबकत दबकत फिरायला लागली. अशा खडतर परिस्थितीतही कोल्हापूरकरांनी केलेल्या या कार्याची सर्व स्तरातून स्तुती होते आहे.

    follow whatsapp