जात प्रमाणपत्रावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांची मुंबईपाठोपाठ अकोला आणि वाशिम जिल्ह्यातही जात पडताळणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
वाशिम आणि अकोला जिल्हा जात पडताळणी समितीने देखील अशाच प्रकारची माहिती दिली आहे. या दोन्ही कार्यालयांमध्ये समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने जात पडताळणी झाली असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, शाळा दाखल्यांतील माहितीत काय आहे तफावत?
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंदर्भात मुंबई, अकोला आणि वाशिम जिल्हा जात पडताळणी समितीकडे समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने झालेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राचा तपशील मागितला होता. यासंदर्भात मुंबईतील जात पडताळणी समितीने बुधवारी (22 डिसेंबर) समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने जात पडताळणी झाली नसल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता वाशिम आणि अकोला जिल्हा जात पडताळणी समितीने देखील अशाच प्रकारची माहिती दिली आहे.
समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली-नवाब मलिक
दरम्यान, क्रूझ ड्रग्स पार्टी कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल शंका उपस्थित केलेल्या आहेत. तसेच खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोपही मलिक यांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदांमधून यावर भाष्य केलं होतं.
बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने मुंबई, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी सादर केलेली कागदपत्रे मिळावीत अशी मागणी केली होती. त्यात समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्याची माहिती तीनही जातपडताळणी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
‘मागासवर्गीय कोट्यातून एनसीबीचे अधिकारी झालेले समीर वानखेडे यांनी नोकरीत रुजू होताना नेमकी कोणती कागदपत्रे सादर केली’, असा प्रश्न आता यादव यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT