शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. तसंच सध्याची त्यांची अवस्था स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रूग्णासारखी आहे असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत विजय शिवतारे?
“संजय राऊत यांची निष्ठा शिवसेनेसोबत किती आहे आणि शरद पवारांसोबत किती आहे हे सगळ्यांना माहित आहे. जे महाराष्ट्राला कळतंय, आमदारांना कळतंय ते उद्धव ठाकरे यांना कळत नाही? संजय राऊत यांना आपल्यालाच सगळं समजतं आहे असा भास होतो आहे. दुभंगलेलं व्यक्तिमत्व असा एक प्रकार असतो ज्याला स्क्रिझोफ्रेनिया झालेला रूग्ण म्हणतात. संजय राऊत यांची अवस्था त्या रूग्णासारखीच आहे.” असाही टोला विजय शिवतारे यांनी लगावला.
शिवसेनेत एवढी मोठी फूट पडली आहे तरीही उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्यायला सांगितलं आहे. हे काय आहे? भानामती आहे, गारूड आहे की हिप्नॉटिझम? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. टीव्ही ९ मराठीसोबत संवाद साधत असताना विजय शिवतारे यांनी ही टीका केली आहे.
शिवसेनेत २१ जूनला बंड झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार गेले. तसंच इतर ११ अपक्षांचं बळही त्यांना लाभलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. तसंच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्यानंतर या दोघांवर तसंच भाजपवर बरीच टीका झाली. मात्र शिवसेनेत आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
विजय शिवतारे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच शिवसेनेत झालेल्या बंडानंतर माझं उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालेलं नाही किंवा भेटही झालेली नाही असंही विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा माझ्या मागण्यांसाठी मी त्यांना अनेक पत्रं लिहिली मात्र काहीही निर्णय घेतला नाही.
हकालपट्टीवर प्रश्न विचारला असता विजय शिवतारे म्हणाले मी २९ जूनलाच हे सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहे. अशात माझी हकालपट्टी झाली असं कसं म्हणता येईल? हे लोक माझी काय हकालपट्टी करणार? मीच सांगितलंय मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातो आहे. त्यामुळे माझी हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही. एवढंच नाही तर संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडली असाही आरोप विजय शिवतारे यांनी केला.
गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही, हा भास संजय राऊत यांना झाला. आदित्य ठाकरेंना घेऊन गेले आणि तिकडे तमाशा झाला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की यांची लढाई आमच्याशी नसून नोटाशी आहे. खरंच नोटापेक्षा कमी मतं शिवसेनेला मिळाली. ही नामुष्की आहे. त्यानंतर संजय राऊत यांना दुसरा भास झाला की उत्तर प्रदेशात आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन योगी सरकारला नमवू शकतो. तिथे १३९ उमेदवार उभे केले. १०० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
संजय राऊत यांना तिसरा भास झाला की एक ना एक दिवस आम्ही उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू. आता याला काय म्हणायचं? चुकीचे विचार प्रखरपणे बिंबवण्यातून हे सगळं झालंय की काय माहित नाही, असं शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच स्क्रिझोफ्रेनिया रूग्णासारखी त्यांची अवस्था झाल्याचाही टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT