शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. तानाजी सावंत यांच्यावर टीका करत असताना नाव तानाजी मात्र वागले सूर्याजी पिसाळांसारखं असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. दहीसर या ठिकाणी शिवसेनेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना या चार अक्षरांनी आज आम्हाला मोठं केलं आहे. आज कुठेही जा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे हे वाघ आहेत असं आपल्याला म्हटलं जातं ते फक्त शिवसेनेमुळेच. आम्हाला पाहिल्यानंतर याचा नादाला आपण लागायला नको म्हणून मोदी-शाहही रस्ता बदलात. हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे त्याच्या नादाला लाग नका असा म्हणतात. भगवा झेंडा त्याच्या हातात आहे वेळ पडली तर तो झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल हे देखील यांना माहित आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले तानाजी सावंत यांच्यावर टीका करत म्हणाले तो लफंगा पळून गेलाय. नाव तानाजीचं आणि कृत्य सुर्याजी पिसाळ-खंडोजी खोपड्यांचं असं म्हणत तानाजी सावंतांवर त्यांनी टीका केली. शनिवारीच तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिकांनी दुकानाच्या बोर्डवर खेकडा सावंत असं लिहित आंदोलन केलं होतं. त्यापाठोपाठ आता आज संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.
बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला होता. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की जशास तसं उत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. अशात आता मागच्या दोन ते तीन दिवसांपासून शिवसेना बंडखोर आमदारांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झालेली दिसते आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
जर महानगर पालिका निवडणुका आपण प्रचंड बहुमताने जिंकलो तर गुवाहटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत जातील. शिवसेनेतली ही कीड कायमची संपून जाईल. यांना शिवसेनेनं काय दिलं नाही? अनेकांवर अन्याय करत यांना संधी दिली आणि हे आता आपल्याला सोडून गेले असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.
गुलाबराव पाटील यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. गुलाबराव पाटील हे आता पुन्हा पान टपरीवर बसतील हा माझा शब्द. माझा शब्द खोटा ठरत नाही हा इतिहास आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संदिपान भुमरेंना तिकीट मिळालं तेव्हा ते साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. मुंबईला आले होते तेव्हा त्यांना वडा सांबार खाता येत नव्हतं. जमिनीवर बसून वडा सांबार खात होते, आज ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे गेले, शिवसेनेने मला मोठं केलं असं म्हणत रडले. माझ्याजवळ आले आणि रडले. मात्र त्यांचे अश्रू खोटे होते हे आता आम्हाला कळलं आहे. या महाराष्ट्राचा बिग बॉस कुणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हेच आहेत. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊद्या.. प्रकाश सुर्वे भाजी विकत होते त्यांना परत भाजी विकायला पाठवूया असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT