मंत्रिमंडळ विस्तार : संजय शिरसाट, बच्चू कडूंची नाराजी पुढच्या पंधरा दिवसात दूर होणार?

मुंबई तक

• 03:32 AM • 18 Sep 2022

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजप सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दसऱ्यापूर्वी होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या संजय शिरसाट, बच्चू कडू या आमदारांची नाराजी दूर होण्याची […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजप सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दसऱ्यापूर्वी होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या संजय शिरसाट, बच्चू कडू या आमदारांची नाराजी दूर होण्याची आशा आहे.

हे वाचलं का?

शिंदे गट – अपक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार आटोपण्यात आला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला.

शिंदे गटातील अनेक जण मंत्रिमंडळात संधी मिळणार, यामुळे आनंदात होते. मात्र, ऐनवेळी त्यांना बाहेरच राहावं लागलं. दुसरीकडे शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्षांनाही मंत्रिपदाची आस होती. पण, भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही.

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं आमदार नाराज असल्याची चर्चा सातत्यानं होत आहे. संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासह काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार हा शिंदे-फडणवीसांठी कसरतीचा ठरणार आहे.

मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही : बच्चू कडू

लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त करत माझ्या आटोक्या बाहेरचा विषय असे म्हणाले. मात्र आमच्यासाठी मंत्रिपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही, असे त्यांनी नुकतेच जाहीरपणे बोलून दाखविले.

शिंदे-फडणवीस सरकार : मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ वृत्तपत्राशी बोलताना कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल भाष्य केले होते. ते म्हणाले, “19 मंत्र्यांच्या सरकारमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्के मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ ४३ जणांचं असेल”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    follow whatsapp