मुंबई : संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजीव भोर पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह आज (शनिवार) बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितमध्ये वर्षा बंगल्यावर पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. प्रवेशानंतर लगेचचं त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच संजीव भोर पाटील यांनी ट्विट करुन नव्या पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते, जिथे आम्हाला आमच्या मराठा समाजासह शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, सर्वसामान्य घटकांना न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची चांगल्यात चांगली संधी मिळू शकेल,असा नेता, राजकीय पर्याय आणि संधीचा विचार सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेल लक्ष्य?
दरम्यान, संजीव भोर यांच्या रुपानं एकनाथ शिंदे यांनी एकाच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील दुसरा मोठा नेता पक्षात आणला आहे. नुकतचं राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ठाणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेत फुट पाडल्यानंतर पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
विखे पाटील यांना आव्हान?
संजीव भोर पाटील यांच्यारुपानं शिंदे यांचं अहमदनगर जिल्ह्यात भाजपला आणि प्रामुख्याने विखे पाटील कुटुंबीयांना आव्हान देण्याचा प्रयत्न आहे का? असाही सवाल विचारला जात आहे. कारण संजीव भोर पाटील यांना विखे पाटील कुटुंबियांचा पारंपारिक विरोधक म्हणून ओळखलं जातं. २०१९ साली त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात अहमदनगर दक्षिणमधून त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
कोण आहेत संजीव भोर पाटील?
संजीव भोर पाटील हे पेशाने इंजिनियर आहेत. मात्र मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. 2012 साली ते संभाजी ब्रिगेड सोबतत जोडले गेले. त्यानंतर 2014 ला त्यांनी स्वतःची शिवप्रहार संघटना स्थापन करून राज्यभर मराठा समाज्यावर होणाऱ्या खोट्या अॅक्ट्रिसिटी गुन्ह्याबाबत आवाज उठवला होता.
2016 मधील कोपर्डी प्रकरणानंतर संजीव भोर पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली होती, त्यानंतर मराठा मोर्चाचे समन्वयक म्हणुन त्यांनी राज्यभर काम पाहिले होते. 2019 ला त्यांनी पारनेर येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्पवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी पारनेरमध्ये निलेश लंके यांचा प्रचार केला होता, त्यात लंकेचा विजय झाला होता.
ADVERTISEMENT