सातारा : राष्ट्रवादीच्या 2 आमदारांनी ताकद लावलेल्या खेड ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

इम्तियाज मुजावर

• 08:24 AM • 19 Sep 2022

सातारा : जिल्ह्यात सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये धक्कादायक निकाल समोर येत आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सातारा शहरालगतच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकवला. शिंदे यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवत सत्तांतर केले […]

Mumbaitak
follow google news

सातारा : जिल्ह्यात सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये धक्कादायक निकाल समोर येत आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सातारा शहरालगतच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकवला. शिंदे यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवत सत्तांतर केले असून सरपंचपदही काबिज केले आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांच्या खेड ग्रामविकास पॅनेलचा मानहानिकारक पराभव झाला. त्यांना अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. खेड ग्रामविकास पॅनेलचे कांतीलाल कांबळे, सुशीला कांबळे, निखिल यादव यांच्यासह 5 उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीत महेश शिंदे गटाच्या विनोद माने, सुलभा लोखंडे, संतोष शिंदे, सुधीर काकडे, स्मिता शिंदे, सुमन गंगणे, शरद शेलार, वंदना गायकवाड, शामराव कोळपे, प्रियांका संकपाळ, चंद्रभागा माने अशा 12 उमेदवारांनी विजयी पताका फडकवली. तर शिंदे गटातील लता अशोक फरांदे यांनी सरपंच पदावर बाजी मारली आहे.

गत विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. त्यानंतर महेश शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतही शशिकांत शिंदे यांच्याकडून ताब्यात घेतली. पाठोपाठ सातारा जिल्हा बँकेमध्ये देखील शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला.

त्यानंतर झालेल्या सोसायटी निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे गटाला पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यानंतर आता राजकीयदृष्ट्या महत्वाच्या खेड ग्रामपंचायतीमध्येही शशिकांत शिंदे गटाचा दारुण पराभव करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्या पराभवाची मालिका तीन वर्षांनंतरही कायम ठेवली आहे.

    follow whatsapp