जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागील 15 दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका हा सर्वाधिक ग्रामीण भागाला बसला आहे. कारण इथल्या शाळकरी मुलामुलींना शाळा गाठण्यासाठी कधी बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो आहे तर कधी पायी शाळेत जावं लागतं आहे. परिवहन मंडळातर्फे मानव मिशन बस या मुलांसाठी चालवली जाते. मात्र संप असल्याने ती देखील बंद आहे.
वाशिम जिल्ह्यातील आवरदारी या छोट्या गावातले 20 ते 25 विद्यार्थी जऊल्का गावातल्या शिवाजी विद्यालयात शिकण्यासाठी जातात. या मुलांना शाळेत नेण्याचं आणि परत गावात सोडण्याचं काम मानव मिशन बसतर्फे केलं जात होतं. मात्र एसटीच्या संपामुळे परिवहन मंडळातर्फे चालवण्यात येणारी ही बस सेवाही बंद आहे. त्यामुळे या मुलांना शाळा गाठण्यासाठी कधी पायपीट करावी लागते आहे तर कधी बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो आहे.
ही मुलं घरातून शाळेत जाण्यासाठी पायी निघतात, रस्त्यात त्यांना कुठलं खासगी वाहन किंवा बैलगाडी दिसली तर त्यांना हात करतात आणि शाळा गाठतात. शाळेतून येताना त्यांना असाच काहीतरी मार्ग शोधावा लागतो. या सगळ्यात घरून शाळेत पोहचायला आणि शाळेतून घरी पोहचायला या मुलांना उशीर होतो.
एसटीचा संप मिटावा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी पगारवाढीची घोषणा केली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी कायम आहे. त्यामुळे आझाद मैदानावरचं आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे. बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे. अशात आता एसटीच्या संपामुळे होणारे विद्यार्थ्यांचे हालही समोर आले आहेत.
ADVERTISEMENT