मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि वाद झाले आहेत. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास (ट्रस्ट) जमीन खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी असं म्हटलं होतं की सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं. तसंच सामनातून अग्रलेख लिहूनही या प्रकरणी टीका करण्यात आली होती. आता यावरूनच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेनेनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या जागेच्या व्यवहाराबाबत जे आरोप झाले त्यावर टीका केली त्यामुळे भाजयुमो तर्फे म्हणजेच भारतीय युवा मोर्चातर्फे शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना भवनाच्या बाहेर भाजयुमोचं आंदोनल सुरू आहे हे समजताच शिवसेना कार्यकर्तेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आणि मग दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहण्यास मिळालं.
या आंदोलनात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बळाचा वापर करून पोलिसांना या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवावं लागलं. ज्यानंतर भाजप मुंबईने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेनेवर टीका केली आहे.
राम मंदिर जमीन घोटाळा : हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं – संजय राऊत
काय म्हटलं आहे या ट्विटमध्ये?
राममंदिर उभारणीच्या धर्मकार्यात खोडा घालणाऱ्या शिवसेनेला भाजप युवा मोर्चाने चांगलीच फटकार दिलीय. त्याचा घाव इतका वर्मी लागलाय की, शिवसेनेच्या डरपोक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वर्दीआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले. हे सैनिक कसले…अरे हे तर पळपुटे. शिवसेनेला फटकार! असं म्हणत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.
अयोध्या जमीन गैरव्यहार प्रकरण काय आहे?
लखनऊ ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली.
दरम्यान ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत. मागील 100 वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.
ADVERTISEMENT