अनाथांची माय म्हणून जगाला परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या गॅलेक्सी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आत्तापर्यंत सिंधुताईंनी 1500 हून जास्त अनाथ मुलांचं संगोपन केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
काय म्हणाले डॉ. शैलेश पुणतांबेकर?
गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.’
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 ला महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी झाला. घरात मुलगी नको असताना त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव चिंधी असं ठेवण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागात असलेलं नवरगाव हे त्यांचं जन्मगाव. सिंधुताई सपकाळ यांचे वडील गुरे वळण्याचं काम करत असत. सिंधुताईंनाही शिक्षण घेत असताना गुरे वळावी लागत असत आणि मग शाळेत जावं लागेल. त्यांना चौथीपर्यंतचं शिक्षणही कसंबसं मिळालं. मात्र बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि सुरेश भटांच्या कविता, पुस्तकं यांचा त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पडला. लकीर की फकीर असं त्या स्वतःला म्हणून घेत असत.
सिंधुताईंचा विवाह त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झाला. सासरीही प्रचंड सासूरवास सहन करावा लागला. जंगलात जाऊन लाकडं गोळा करणं, गुरे वळणं हे त्यांना करावंच लागे. शेण गोळा करताना सापडेले कागदाचे तुकडे सिंधुताई घरी आणायच्या आणि त्या उंदराच्या बिळात ते तुकडे लपवून ठेवायच्या. घरी एकट्या असतील तर अभ्यास करण्याचा प्रयत्न करायच्या.
सिंधुताई सपकाळ, नामदेव कांबळे, गिरीश प्रभुणे यांना पद्म पुरस्कार
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता.
दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.
सिंधुताईंना त्यांच्या कार्यासाठी आत्तापर्यंत 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मूर्तीमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार हे त्यातले काही निवडक पुरस्कार आहेत. ज्यांच्या नशिबी फक्त अवहेलना आली, जन्म घेतल्यानंतर त्यांच्या चिंधी या नावापासूनच ती सुरू झाली होती त्या पुढे जगासाठी जागृतीची पणती झाल्या. अनाथांची माय झाल्या. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने आता कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT