प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागलं ते गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीमुळे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत विश्वंभर चौधरी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ यांनी सगळ्यांनीच या कृतीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. असे प्रकार घडणं निंदनीय आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
मागील पाच सहा महिन्यांपासून हा जो वाद सुरू होता. एक पुस्तक कुबेर यांनी लिहिलं आहे, जे मी स्वत: वाचलेलं आहे. कुबेर यांची मतं त्यात आहेत. लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार असल्याने व्यक्त करण्याची भूमिका ते घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे, दुसरेही घटक असू शकतात. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण स्वीकारलेलं आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानंतर आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट एखाद्या लेखकाने लिहिली तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे, ही गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे आणि आम्ही कुणीही त्याचा पुरस्कार कधीच करणार नाही. ही घटना निंदनीय आहे. या गोष्टी, घटना महाराष्ट्राला शोभत नाही आणि विशेषत: शिरवाडकर यांच्या नावाने ज्या परिसरात हा मराठीजनांचा सोहळा इतक्या उत्साहात आणि उत्तमरित्या सुरू आहे. अशा परिसराच्या जवळ हा प्रकार घडणं चुकीचं आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
संभाजी ब्रिगेड असं काहीतरी करू शकते का? अशी कुणकुण लागली होती. मी स्वतः त्यामुळे गेटवर गेलो होतो. मी गिरीश कुबेर यांचं स्वागत करून त्यांना घेऊन आलो. त्यांच्याशी चर्चा केली. ते खूप आनंदी होते, त्यांना पुस्तक स्टॉल्स बघायचे होते. मी त्यांच्यासोबतच होतो, अधिकारीही होते. पण खाली येत असताना ती बॅटरीची कार स्लो झाली. त्यावेळी पुण्याहून आलेल्या दोघांनी गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली. हे घडताच आम्ही त्यांना व्हिआयपी रूममध्ये घेऊन गेलो. मी कुसुमाग्रज नगरी त्यांना फिरवत असताना पूर्णवेळ त्यांच्यासोबत होतो. तरीही हा दुर्देवी प्रकार घडला ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
संभाजी ब्रिगेडने जे पाऊल गिरीश कुबेर यांच्याबाबत उचललं ते अत्यंत चुकीचं आहे. विचारांचा लढा हा विचारांनी द्यायचा असतो. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्यात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संभाजी ब्रिगेडने केलेली शाईफेक निषेधार्ह आणि निंदनीय आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गिरीश कुबेर हे अभ्यासपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचं पटलं नाही तर वैचारिक लढाई लढली पाहिजे. ही पद्धत अत्यंत अयोग्य आणि चुकीची आहे.
काय म्हणाले विश्वंभर चौधरी?
भाषा आणि कृती महत्त्वाची असते, जर त्याला विरोध करायचा असेल तर तो सनदशीर मार्गाने केला गेला पाहिजे. अशा घटना घडल्या तर जो समाज घडेल त्यात लोक बोलणं, लिहिणं सोडून देतील मग असा समाज घडेल जो मृत असेल. आपण नथुराम गोडसेही सहन केलं आहे. पुस्तक बंदी हा काही उपाय नाही असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT