राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांच्या यंत्रणेबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पोलिसांनी अगोदरच यासंदर्भातील इशारा दिला होता, अशी माहिती समोर आली आहे. यात आठ ठिकाणी आंदोलन होईल असं म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
८ एप्रिल रोजी शरद पवारांच्या घराबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी पोलिसांना याची माहिती का नव्हती असे प्रश्न उपस्थित केले होते. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
सिल्व्हर ओक हल्ला: पोलीस विभाग कमी पडला, मास्टरमाईंड शोधला जाईल-अजित पवार
दरम्यान, या प्रकरणात अनेक घडामोडी घडत असताना एक पत्र समोर आलं आहे. हे पत्र मुंबई पोलिसांचं असून, मुंबईचे कायदा व सुव्यवस्था सह पोलीस आयुक्तांना देण्यात आलेलं होतं. या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन अधिक आक्रमक केलं जाणार असल्याचा इशारा दिलेला आहे.
महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या घरासह मुंबईतील आठ ठिकाणी आक्रमक स्वरूपाची आंदोलनं केली जाण्याची शक्यता असल्याचं सांगत गुन्हे अन्वेषन विभागाने संबंधित ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्याचा इशारा दिलेला होता.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग ‘सिल्व्हर ओक’पर्यंत; शरद पवारांनी मांडली भूमिका
गुन्हे अन्वेषन विभागाच्या पत्रात काय म्हटलंय?
उच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख ५ एप्रिल २०२२ रोजी आहे. त्यानुषंगाने आझाद मैदानात १,५०० ते १,६०० पुरुष व महिला आंदोलक येत-जात आहेत. आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनीकरणाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध लागण्याची जाणीव कर्मचाऱ्यांना झालेली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी मंत्रालयात ५ एप्रिल रोजी २०२२ रोजी सिल्व्हर ओक, मातोश्री बंगला, याठिकाणी आंदोलन करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
एसटी कर्मचारी हे खासगी वाहनाने किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे. खासगी वाहनाने मुलुंड चेक नाका, वाशी चेक नाका व दहिसर चेक नाका येथून प्रवेश करणार असून, त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावी, ही विनंती.
ती ठिकाणं कोणती होती?
आंदोलक त्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलक आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री बंगला, वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीगृह, सार्वजनिक परिवहन मंत्री यांचं शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील खासगी निवासस्थान, उच्च न्यायालय, सिल्व्हर ओक या ठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आह.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य तो बंदोबस्त लावणे उचित होईल, असं गुन्हे अन्वेषन विभागाचे अपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना (कायदा व सुव्यवस्था) दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT