राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पार्थ पवार आणि बहिणींच्या मालमत्तांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. आयकर बहिणीच्या घरी पडलेल्या धाडींबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. या कारवाईवर शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला.
ADVERTISEMENT
सोलापूरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ‘काही लोकांनी मला चिठ्ठी दिलीये. काल अजित पवारांकडे सरकारने काही पाहुणे पाठवले होते. पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला नाही. मला आठवतंय. तुम्हाला आठवतंय का? निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणात मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेचं कर्ज मी आयुष्यात घेतलं नाही. असं सगळं असताना मला ईडीची नोटीस आली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि त्यानंतर संबध महाराष्ट्राने भाजपला येडी ठरवलं’, असा टोला पवारांनी भाजपला लगावला.
अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी झालेल्या छापेमारीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आज अजित पवारांबद्दल काही असेल. आणखी कुणाबद्दल काही असेल. या सगळ्यांचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या संतापातून आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला.
शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर निशाणा
‘ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची शेतकरी आणि शेतीबद्दलची भूमिका काय आहे? त्यांना शेतकऱ्याची आस्था नाही. काही प्रश्नांसाठी उत्तर प्रदेशातील लखीमपूरला लोक रस्त्यावर आले. कोण आले रस्त्यावर, तर शेतकरी! कशासाठी रस्त्यावर आले? तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे उत्तर प्रदेशातील भाजपचं सरकार दुर्लक्ष करतंय. म्हणून निदर्शन करण्यासाठी आले होते. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या. आठ लोक मृत्यूमुखी पडले’, असं पवार म्हणाले.
‘सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नोटीस दिली. मरण पावलेल्यांमध्ये एक पत्रकार होता. दोन सामान्य माणसं होती आणि पाच ते सहा शेतकरी होते. त्यांची माहिती आता सर्वोच्च न्यायालयाने मागितली आहे. पण हातात सत्ता दिली, ती लोकांचं भलं करण्यासाठी, याचं विस्मरण भाजपला पडलं आहे. भाजपने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून हत्या करण्याचं पाप केलं’, अशी टीका शरद पवार यांनी केली.
ADVERTISEMENT