स्मिता शिंदे, जुन्नर
ADVERTISEMENT
‘कोरोनाच्या संकटात लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र करणे टाळले पाहिजे’ अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर कार्यक्रमात दिल्या आहेत. जुन्नरमधील आयोजित एका कार्यक्रमाला आलेले असताना शरद पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.
‘वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं. व्यासपीठावरील गर्दी टाळून हा कार्यक्रम होतोय मात्र, काळजी घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केलं आहे.’ ते जुन्नर येथील संजय काळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पवारांची भाजपवर टीका
दरम्यान, यावेळी बोलताना भाजप सरकारवर टीका करण्याची संधी मात्र, शरद पवार यांनी सोडली नाही. ‘आपल्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं, पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली जाऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिरची फेकून द्यावी लागत आहे. मात्र, आता साखरेचे भाव वाढत आहेत. अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा भाव देता येईल.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.
पवारांचा ‘कोल्ड स्टोरेज’ची व्यवस्था करण्याचा सल्ला
‘दरम्यान, जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली आहे. त्यामुळे येथील आंब्यासाठी आणि भाजीपाला खराब होऊ नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाचवता येईल.’ असा सल्लाही पवार यांनी मार्केट कमिटीला दिला आहे.
कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती कमी असल्याने पवार नाराज
दरम्यान, सभेला महिलांची उपस्थिती कमी असल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला इथं का उपस्थित आहेत? आम्ही पन्नास टक्के आरक्षण आणलंय. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज घडवले, यांच्या संस्काराने स्वराज्य घडलं. त्यामुळं या आपल्या राजमातांना संधी द्या, प्रोत्साहित करा.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.
Amit Shah यांच्याकडे सहकार मंत्रालय हा शरद पवार आणि महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा?
दुसरीकडे याच व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही केंद्र सरकारच्या सहकार संपवण्याच्या भूमिकेवर टीका केली. केंद्र सरकार छुप्या पद्धतीने अर्बन बँका, जिल्हा बँका, मार्केट कमिटी या सगळ्या सहकार क्षेत्रावर आपला वेगळाच वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सहकारातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागाला चांगले स्थान प्राप्त झाले आहे. मात्र आता केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT