महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. तसंच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा रद्द केल्याबद्दल त्यांचंही कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ट्विट करून शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत शरद पवार?
“कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत” असं ट्विट करत शरद पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली आहे.
नितीन राऊत यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
एका गोष्टीचा मी अभिमानाने उल्लेख करेन की, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर नितीन राऊत त्यांच्या घरातील लग्न समारंभ अगदी गेल्या आठवड्यात इकडेच येऊन नितीनजी आणि वहिनी यांनी आम्हाला आग्रहाने आमंत्रण दिलं. की, या तारखेला नागपूरमध्ये नंतर मुंबईमध्ये आपण अगत्याने यायचं. यावेळी त्यांनी मला सांगितंल, उद्धवजी काळजी करु नका मी सगळे नियम काटेकोरपणे पाळणार. मी म्हटलं देखील बघा बरं… तर ते म्हणाले नाही काळजी करु नका. पण आज त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा जो काही सोहळा असतो तो त्यांनी रद्द केला आहे. याला म्हणतात सामाजिक जाणीव, नितीनजी मी तुम्हाला, तुमच्या मुलाला या शुभकार्यासाठी शुभेच्छा तर देतोच. जनतेच्या वतीने आशीर्वाद देखल देतो आणि आपण दाखवलेली ही जाणीव इतरही सगळे जण दाखवतील अशी अपेक्षा करतो.
ही बातमी वाचलीत का? मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या मंत्र्याचं CM ठाकरेंकडून कौतुक
उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांचं कौतुक केल्यानंतर इतरही मंत्री, महत्त्वाच्या व्यक्ती तसंच समाजात वावरणारे सगळेच जण अशी सजगता दाखवतील अशी अपेक्षा केली होती. त्यानंतर आज शऱद पवार यांनी ट्विट करून त्यांचे सगळे सामाजिक कार्यक्रम रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT