मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं त्यांच्याविरोधात चार्टशीटस दाखल केली आहे. त्या चार्टशीटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. २००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हाचे केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक बैठक तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती. आता या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
पत्राचाळ प्रकरणावर काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले ” तपास यंत्रणेने काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. ईडीची या प्रकरणात चौकशी सुरू आहे, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आत कोर्टात ज्यानं त्यानी आपली भूमिका मांडावी. कोर्ट काय निर्णय घेईल तो घेईल. यात काय आरोप होत आहेत यावर बोलणं योग्य नाही.”
पत्राचाळ घोटाळ्याला नवं वळण, संजय राऊतांच्या चार्जशीटमध्ये ईडीने केला शरद पवारांचा उल्लेख
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ” मला वाटतं हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य तपास यंत्रणा यांच्या संदर्भातील आहे. त्यामुळे जी काय चौकशी होईल त्यामध्ये हे सर्व समोर येईल. अतुल भातखळकर यांनी जर मागणी केली असेल तर गृहमंत्री त्याची चौकशी करतील, त्या बैठकीमध्ये काय झालं याची चौकशी होईल. त्यामुळे चौकशीअंती जे काय समोर येईल ते महाराष्ट्राला कळेलच.”
अतुल भातखळकरांची चौकशीची मागणी
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भातखळकर ट्विट करत म्हणाले ”मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी”.
ADVERTISEMENT