ज़का खान :
वाशिम : शिंदे सरकारमधील विद्यमान अन्न, औषध प्रशासन मंत्री आणि मविआ सरकारमधील तत्कालिन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचं वाशिम जिल्ह्यातील सावरगांवमधील गायरान जमीन वाटप प्रकरण वादग्रस्त ठरलं आहे. अशात त्यांच्याशी संबंधित आणखी एक गायरान जमीन प्रकरण उजेडात आलं आहे.
ADVERTISEMENT
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरालगतची १० एकरांमधील कोट्यवधी रुपयांची शासकीय गायरान जमीन भू-माफियांच्या नावे करण्याचा आदेश पारित केला असा आरोप संजय राठोड यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्री राठोड पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहेत.
कारंजा शहरालगत असलेली कोट्यावधी किंमतीची १० एकर गायरान जमीन दोन भू-माफियांना दिल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर करण्यात येत आहे. वाशिमचे तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या जमिनीची मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांने बनावट दस्तावेज तयार करून जमीन नावे केल्याचा ठपका ठेवत संबंधित दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मात्र या आदेशाला बगल देत आणि न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत मंत्री संजय राठोड यांनी गायरान जमीन वाटप केली. रोहित राधेश्याम लाहोटी आणि युनूस अन्सारी यांना ही जमीन वाटप केली असा आरोप करण्यात येत आहे. रोहित लाहोटी यांनी तर या गायरान जमिनीला ले-आउट मंजूर करून विक्री ही केल्याचे समजतं आहे.
कारंजा शहरातील काळी भागात असलेल्या गट क्रमांक -100 /1 व 100/1/अ मधील १० एकर जमीन दोन व्यक्तींना ७ ऑगस्ट २०१९ रोजी तत्कालीन महसूल मंत्री संजय राठोड यांनी दिल्याचा आरोप होत आहे. राधेश्याम लाहोटी आणि युनूस अन्सारी यांना प्रत्येकी ५ एकर जमीन दिल्याचा आदेश काढण्यात आला, असा आरोप आहे.
रोहित राधेश्याम लाहोटी यांनी या जमिनीवर NA केला असून त्याठिकाणी प्लॉट पाडून विक्री केली अशी माहिती आहे. युनूस अन्सारी यांची जमीनीची जागा खुली असली तरी तो प्लॉटिंग आणि प्रॉपर्टी एजंट असल्याचं बोलल जात आहे. ही जमीन इ क्लास असल्याचही सांगितलं जात आहे. वाशिम जिल्ह्यातील संजय राठोड यांचं जमीन वाटपाचं हे दुसरं प्रकरण असून या मुळं जिल्ह्यातील इ क्लास, गायरान जमिनी वाटपाची सर्व प्रकरणाच्या चौकशी ची मागणी होत आहे.
ADVERTISEMENT