आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगात प्रकरण पोहोचलं असून, आता युवा सेनेकडेही शिंदे गटाचं लक्ष गेलं आहे. युवा सेना प्रमुख पदी शिंदे गटाची व्यक्ती बसवण्याची मागणी पहिल्यांदाच समोर आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना युवा सेना प्रमुख करण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केलीये. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंसमोरच ही मागणी करण्यात आलीये.
ADVERTISEMENT
बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. या संबंधी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आता युवा सेनाही शिंदे गट ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.
प्रतापराव जाधवांनी काय केली मागणी?
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी प्रतापराव जाधव यांनी ही मागणी केली. आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी. श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा”, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली.
युवा सेनेवरून शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने युवा सेनेतही बदल केले होते. शिंदे गटाने वरूण सरदेसाईंची युवा सेनेच्या राज्य सचिव पदावरून हकालपट्टी केली होती. तर किरण साळींची राज्य सचिवपदी नियुक्ती शिंदे गटाने केली होती.
त्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी किरण साळींची हकालपट्टी केली होती. त्याचबरोबर युवा सेनेचे पदाधिकारी असलेले प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. पूर्वेश सरनाईक यांनी ठाण्यातील युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तसेच त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.
आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या निशाण्यावर
बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने अशी भूमिका घेतली होती की, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही. तसेच इतरांनी केलेली टीकाही खपवून घेणार नाही. दरम्यान, नंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा, तर राज्यात शिव संवाद यात्रा काढली. या य़ात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर गद्दार म्हणत निशाणा साधला.
त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनातही बंडखोर आमदारांना ५० खोके एकदम ओके म्हणत आदित्य ठाकरेंनी डिवचलं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गट टीका करताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाने थेट आदित्य ठाकरेंना पपू म्हणत लक्ष्य केलं. त्यानंतर आता थेट युवा सेना प्रमुख पदावरच शिंदे गटाची नजर गेली आहे.
ADVERTISEMENT