मुंबई : शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाची दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही दोन्ही गटांचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय खासगी बसेसचही हजारोंच्या संख्येने आरक्षण करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश या भागातून मुंबईत येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी बसगाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. यात शिंदे गटाकडून 3 हजार आणि ठाकरे गटाकडून 1 हजार 400 बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या मुंबईत दसऱ्याच्या दिवशी बुधवारी दुपारपर्यंत पोहोचतील, असे नियोजन आहे. मात्र यामुळे दसऱ्या दिवशी मुंबई मोठ्या प्रमामावर वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.
केवळ पार्किंगसाठी 10 मैदानं बुक
दरम्यान, या मेळाव्यासाठी येणाऱ्या केवळ गाड्यांच्या पार्किंगसाठी शिंदे गटाकडून बीकेसी मैदानाच्या आसपासची दहा मैदानं बुक केलेली आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. बुधवारी सायंकाळी शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
उद्धव ठाकरेही सज्ज
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पक्ष वाढवण्यासाठी आणि नव्याने बांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काही पक्षप्रवेशही होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय या सभेत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर तुटून पडणार हे निश्चित आहे. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळाव्यात याची झलक दिसून आली होती.
ADVERTISEMENT