मुंबई: ‘कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टॉमेटो सॉस लावून फिरत असेल आणि सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचं नाव न घेता बोचरी टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
ADVERTISEMENT
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
‘या राज्याचे विरोधी पक्ष नेते यांना लोकशाहीची एवढी चिंता आहे तर त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करु. त्यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे ती फक्त महाराष्ट्राविषयी नसेल तर राष्ट्रीय स्तरावर असू शकते. कारण संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारची हुकूमशाही निर्माण झाली आहे का? अशी चिंता निर्माण झाली आहे. याचा परिणाम कदाचित त्यांच्यावर झाला असेल.’
‘महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरेंना ओळखतात, जे शरद पवारांना ओळखतात त्यांना एक कळेल की, एवढं लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशामध्ये नसेल.’
‘आता विरोधकांवर हल्ले म्हणजे काय.. तर कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टॉमेटो सॉस लावून फिरत असेल आणि सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.’
‘मी कालच सांगितलं आहे की, गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली. का तर.. पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं. अटक करुन सुटका झाल्यावर पुन्हा अटक केली. वारंवार अटक केली. हे नक्की कसलं लक्षण आहे? हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? या मुद्द्यावर सुद्धा फडणवीसांनी मन मोकळं केलं पाहिजे.’
‘परत सत्तेत येऊ शकले नाहीत आणि पुढचे 25 वर्ष सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नाही त्यातून जी काही अस्वस्थता निर्माण झाली आहे. मनात अशांतता आहे. त्यामुळे त्यांनी मन शांत करण्यासाठी आपल्या घरातील देवघरात हनुमान चालीसा पठण करतात.’
‘देवेंद्र फडणवीस हे लोकांची दिशाभूल करत आहेत. हनुमान चालीसा पठण केलं म्हणून कोणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. काल मुंबई उच्च न्यायालयाने देखील याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ते पूर्ण जजमेंट फडणवीसांनी वाचलं पाहिजे. दुसऱ्यांच्या घरात घुसून जर आपण वातावरण बिघडवत असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला होणारच ना.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT