Shiv Sena: पाच वर्ष ‘मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?

मुंबई तक

• 01:55 PM • 13 Jun 2021

मुंबई: अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या (Chief Minister) बोलणीवरून भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली आणि महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आलं. पण आता मोदी-ठाकरे खास भेटीनंतर महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा मुख्यमंत्रीपदावरूनच जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरलंय शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील आलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एका लेखचं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज (13 जून) […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या (Chief Minister) बोलणीवरून भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली आणि महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आलं. पण आता मोदी-ठाकरे खास भेटीनंतर महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा मुख्यमंत्रीपदावरूनच जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरलंय शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील आलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एका लेखचं.

हे वाचलं का?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज (13 जून) संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. यामध्ये राऊत यांनी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही राजकीय पक्षांसाठी सत्ता टिकवणं किती गरजेचं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही, असं स्पष्ट केलं. पण त्याचवेळी मुख्यमंत्रीपदावरही भाष्य केलं. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी (BJP) युती करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत लिहितात, ‘अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे.’

युतीच्या सरकारमध्ये Shivsena गुलाम होती-संजय राऊत

संजय राऊत पुढे लिहितात, ‘शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवेच होते. भाजपने शब्द दिला होता तो पाळला नाही. या वेदनेतून शिवसेनेने नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली. आज शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे व स्वतः ‘ठाकरे’ त्या पदावर विराजमान आहेत.’

‘राजकारण बदलानंतर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील, असा शब्द दिल्लीच्या धावत्या भेटीत पंतप्रधानांकडून मिळाला असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण महाराष्ट्रात भाजपचा झगडाही मुख्यमंत्रीपदासाठीच आहे. बाकी सर्व गोष्टी दुय्यम ठरतात.’

पण राऊत यांच्या याच रोखठोक भूमिकेमुळे दोन प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे, 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचं वचन मिळालं तर शिवसेना पुन्हा भाजपशी युती करेल का?

Narayan Rane: पवार साहेब बोलतात त्याचा उलटा अर्थ लावायचा, ते कधीही शिवसेनेबरोबर…: राणे

दुसरं म्हणजे, परवाच्या दिल्ली भेटीत मोदींकडून ठाकरेंना तसा शब्द मिळाला नाही. मात्र येत्या काळात मुख्यमंत्रीपदाचा शब्द मिळाला, तर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र दिसतील का?

त्याचवेळी महाराष्ट्रात सरकार चालवणं ही तिन्ही पक्षांची गरज आहे, असं म्हणत राऊतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सूचक इशारा दिला आहे. राऊत यांनी आजच्या ‘रोखठोक’मध्ये अनेक गोष्टी बिटविन द लाईन्स मांडल्या आहेत.

महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगत राऊत पुढे लिहितात, ‘सगळं बरं चाललं असताना बसलेली घडी विस्कटण्याचा विचार कोण करेल? दिल्लीच्या धावत्या भेटीचं कवित्व हे फक्त बुडबुडेच आहेत. मोदी-ठाकरे भेटीचं फलित हे वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेणारेच ठरो.’

असं म्हणत राऊतांनी भविष्याच्या राजकारणाची खेळी तर खेळली नाही ना, असा सवाल निर्माण होतो.

Chhagan Bhujbal: ‘वेळ पडल्यास वाघ पंजाही मारतो’, भुजबळांनी का केलं असं वक्तव्य

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृतरित्या कुठे भूमिका मांडण्यात आली नाही. मग संजय राऊतांनी 5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आत्ताच का मांडली, हे गुलदस्त्यातच आहे. पण आजच्या रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबावाची खेळी खेळली आहे.

तर दुसरीकडे पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं वचन असेल तर युती होऊ शकते, असं म्हणत भाजपलाही चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    follow whatsapp