शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राज्यातील मराठा समाजाचे महत्वाचे नेते मानले जाणारे विनायक मेटे यांचे पहाटे अपघातात निधन झाले. मुंबईला जात असताना पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतायत. विनायक मेटे हे महाराष्ट्रातील मराठा समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जायचे.
ADVERTISEMENT
गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा आमदार केलं
मराठा समाजाचा आणि बीड जिल्ह्यातील चेहरा म्हणून भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना हेरलं. 1995 साली युतीचं सरकार होतं. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. एक चळवळीतला चेहरा म्हणून मुंडेंनी 1996 साली राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. खऱ्या अर्थाने 1996 सालापासून विनायक मेटे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
गोपीनाथ मुंडे सोडल्यास बीड जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत होते मतभेद
एकूणच विनायक मेटे यांची राजकीय कारकीर्द पहिली तर बीड जिल्ह्यात त्यांचं इतर नेत्यांसोबत पटत नव्हतं. मग त्यात जयदत्त क्षीरसागर, पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. पण लोकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, अजित पवार, आर.आर पाटील यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांना फारसी अडचण आली नाही.
पंकजा मुंडेंसोबत शेवटपर्यंत होते मतभेद
विनायक मेटे यांचे गोपीनाथ मुंडे हे जरी राजकीय गुरु असले तरी पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचं कधी जमलं नाही. दोघांमधले वाद अनेकदा चव्हाट्यावर आले होते. राज्यात भाजपसोबत असलो तरी बीडमध्ये नाही, अशी भूमिका त्यांनी अनेकदा स्पष्ट केली होती. 2019 सालच्या निवडणुकीत त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला होता. राज्यात महायुतीचा प्रचार करत असलो तरी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा प्रचार करणार, असं त्यांनी जाहीर केलं होतं.
दोघातील वाद मिटवण्यासाठी फडणवीसांची अनेकदा मध्यस्ती
देवेंद्र फडणवीस यांची 2019 साली महाजनादेश यात्रा बीड जिल्ह्यात आली होती. त्यादरम्यान शहरातून काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान पंकजा मुंडे या गाडीत तर विनायक मेटे फडणवीसांसोबत गाडीवर होते. मुंडे भगिनी या नाराज असल्याचे बातम्या समोर आल्या होत्या. फडणवीसांना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे अनेकदा मुंडे आणि मेटे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी फडणवीसांनी मध्यस्ती केल्याचं बोललं जातं.
पंकजा मुंडे यांनी मेटेंच्या निधनावर व्यक्त केलं दुःख
१५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार होतो. मात्र त्यांना काय बोलायचे होते, हे त्यांच्यासोबतच गेले आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. त्या ”टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या. मेटे यांना मी मागील २२ ते २३ वर्षापासून बघत आले आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. मला त्यांच्याविषयी कौतूक वाटायचं,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
ADVERTISEMENT