मुंबईतल्या नेस्को मैदानावर आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानात भाषण करत तुफान टीका केली. एवढंच नाही तर ठाकरी शैलीत त्यांनी अमित शाह यांनाही आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
शिवसेना संपवण्यासाठी सगळे एकमेकांच्या साथीने उभे राहिले आहेत. भाजपने मुन्नाभाईलाही सोबत घेतलं आहे. या उद्धव ठाकरेच्या विरोधात मोदी, शाह, भाजप आमचे गद्दार आणि मुन्नाभाई सगळे एकत्र आले आहेत. याचं कारण एकच आहे यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे तसंच ठाकरे घराणं संपवायचं आहे. मुंबईचा लचका यांना तोडायचा आहे. पण आज माझं या मैदानावरून अमित शाह यांना आव्हान आहे हिंमत असेल तर पुढच्या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना आव्हान दिलं आहे.
जमीन दाखवणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखवू
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पातशाह होते, आदिलशाह, निजामशाह होते. त्यांच्याच कुळातले शाह आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. अमित शाह देशाचे गृहमंत्री ते काय म्हणाले की शिवसेनेले जमीन दाखवायची. आपल्याला जमीन दाखवायची आहे असं म्हणणाऱ्यांना आपण आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत
मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत. लचके तोडणारी अवलाद आहे ती गिधाडांची. ती गिधाडं फिरू लागली आहेत. मुंबई बळकावयची आहे, मुंबई गिळायची आहे. हे काही आजचं नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचून मोठे झालो आहोत. त्यावेळी अनेक आदिलशाह, निजामशाह चालून आले होते. त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह मुंबईत येऊन गेले. काय बोलले? शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहित नाही इथे समोर बसलेली गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवायचा प्रयत्न कराच तुम्हाला आम्ही आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.
वेदांत प्रकल्प गेला, त्यानंतर त्याबद्दल धादांत खोटं बोललं जातं आहे. आरोप प्रत्यारोप केलं. मिंधे गट नुसता तमाशा बघतो आहे. महाराष्ट्राची बाजू घेऊन का सांगत नाहीत? आज दिल्लीत गेले आहेत दिल्लीत गोंधळ आणि गल्लीत मुजरा. कुणामुळे गेला?ते सोडून द्या तुम्ही आणून दाखवा राज्यात प्रकल्प मी तुम्हाला साथ देतो विरोधक तुम्हाला त्यासाठी साथ देतील असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT