नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष जरा जास्त तीव्र झालेला पाहण्यास मिळतो आहे. त्याआधी किरीट सोमय्यांच्या आरोपांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण चालवले. आता शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रोज पाहण्यास मिळतो आहे. सामनाच्या अग्रलेखातून आजही भाजपवर टीका करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडीच्या हातातील हत्यारे झाली आहेत असा उल्लेख आज सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
उद्या महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, संजय राऊत यांची जळजळीत टीका
काय म्हटलं आहे अग्रलेखात?
भाजपने म्हणे भ्रष्टाचाराविरोधात युद्ध पुकारले आहे. रशिया युक्रेनचे युद्ध सुरू आहे सगळ्यांना माहित आहे. पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे ते भ्रष्टाचारविरूद्ध. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध म्हणत असतील ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आड लपून लोक युद्धाचा आव आणत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे.
किरीट आणि नील सोमय्या या पिता पुत्रांनी राकेश वाधवानच्या मदतीने केलेला घोटाळा भविष्यात त्यांना तुरुंगात ढकलत नेणार आहे. कर नाही त्याला डर कशाला हे भाजपवाल्यांचे म्हणणे मान्य केले तर घामाघूम झालेले नील किरीट सोमय्या हे जामीन मिळवण्यासाठी कोर्टात का गेले आहेत? महाविकास आघाडीचे डर्टी पाच डझन नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या करतात. मग तुमचे डर्टी डझन त्या वेळेला काय शिमल्याच्या बर्फात स्वर्ग सुखाचा आनंद घेणार आहेत का?
देशातला सर्वात मोठा लफंगा आणि खंडणीखोर चोर म्हणजे किरीट सोमय्या-संजय राऊत
किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा झाड घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री असताना केलेले उद्योग कोणत्या डर्टी डझनमध्ये बसतात ते लवकरच कळेल. तुमचेही डर्टी बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. दरेकरांनी मुंबै बँक लुटून फस्त केली. त्यामुळे तिथेही तेरावे उरकावेच लागेल. राज्य गमावले म्हणून शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा आमने-सामने येऊन युद्ध करण्याची हिंमत दाखवा. भाजप आता पूर्वीची राहिली नाही ती शिवसेनेला पुरून उरेल असं चंद्रकांत पाटील म्हणतात. हे खरंच आहे कारण भाजप आधी पाठीवर वार करणारी होती आता तिचे रूपांतर शिखंडीत झाले आहे. हा बदल दिसतोच आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातली हत्यारे झाली आहेत आणि देशाला त्यापासून धोका आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी हे शिखंडी अत्यंत खालच्या पातळीला पोहचले आहेत. मात्र या शिखंडींच्या कमरेलाही धोतर आहे आणि त्याची गाठही सुटू शकते हे त्यांनी विसरू नये. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातले सरकार भाजपच्या डोळ्यात खुपते आहे कारण दोन्ही सरकारं बहुमतातील आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे शिखंडी हल्ले बहुमताचे मनोधैर्य खच्ची करू शकणार नाहीत. भाजपचे डर्टी डझनाही एक दिवस तुरुंगात नक्कीच जातील. भाजपच्या डर्टी डझनवाल्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात युद्धाची घोषणा करणं म्हणजे तालिबान्यांनी रशिया आणि युक्रेनला शांततेचं आवाहन करण्याचा विनोदी प्रकार आहे.
ADVERTISEMENT