माझी मजा उडवताय पण तुम्ही महाराष्ट्राला मागे नेताय : कृषीमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचे उत्तर

मुंबई तक

• 01:35 PM • 29 Oct 2022

मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली उडवली होती. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली उडवली होती. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली उडवली.

हे वाचलं का?

यावर आदित्य ठाकरे यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही माझी मजा उडवताय, मला नावं ठेवताय, ठीक आहे, पण महाराष्ट्राला तुम्ही मागे नेताय, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

उद्योग मंत्री, कृषीमंत्र्यांचे राजीनामा घेणार का?

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे राजीनामे घेणार का? असा सवाल केला. ते म्हणाले, एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आणि एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आपल्या राज्याला फटका बसत आहे. शिंदे सरकार फक्त राजकारण करत आहे. कोणताही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण हे देखील माहिती नाही. कृषीमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत वेगळ्या कार्यक्रमासाठी बसायचे असते. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. अशा परिस्थितीत कृषीमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल त्यांनी केला.

एका बाजूला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असताना उद्योगांसाठीही महाराष्ट्र सुरक्षित नाही. आज चौथा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक प्रकल्प राज्यासाठी आम्ही आणले होते. मात्र, आता हे घटनाबाह्य सरकार आल्यावर या डबल इंजिन सरकारमधील एक इंजिन फेल झाले आहे. त्यामुळे या राज्यात येणारी गुंतवणूक आता राज्याबाहेर जात आहे. त्यामुळे आता राज्यातील एवढे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर तुम्ही उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का, असा सवालही त्यांनी सरकारला केला.

उद्योग मंत्र्यांना काम जमत नसल्याच सिद्ध :

यावेळी आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्र्यांना मंत्रिपदाची कार्यपद्धतीच समजली नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार एकत्र काम करून महाराष्ट्रात प्रकल्प आणत होते. मात्र, आताच्या सरकारचे एक इंजिन फेल असल्याने राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत. उद्योगमंत्री म्हणातात प्रकल्प राज्यात येणार. मात्र, अचानक ते प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत, असं होतं नसतं. ते आधी राज्यमंत्री होते, आमच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते, आताही आहेत, पण त्यांना मंत्रीपदाची कार्यपद्धतीच अजून समजली नसल्याचे दिसून येत आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी :

राज्यात परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. याआधी आम्ही पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी घोषणा देऊन मागणी करत होतो. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आताही परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अजूनही बऱ्याच शेतात पाणी साचलेले आहे. या अशा भयानक परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करा, अशी आमची मागणी आहे.

    follow whatsapp