खेड : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु आहेत. अशातच शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम खेडमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बोलत होते.
ADVERTISEMENT
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांच्यासोबत आहेत त्यांनाच जनतेने दिलेला आहे. बाळासाहेब यांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर उध्दवजींकडे पवारांचे विचार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा आणि ताकद दाखवून द्यावी, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
रामदास कदम म्हणाले, आजची जी उद्धव सेना आहे ती शरद पवार यांच्या मांडीवर बसून राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव सेना आहे. कालपर्यंत बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला, त्यांच्या मांडीवर बसून तुम्ही पक्ष चालवत आहात. पण तुम्हाला 16 टक्के निधी आणि त्यांना 57 टक्के निधी, मग आमदार तुमच्याकडे थांबतील कसे? शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळणार नसेल, पण तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांना निधी मिळणार असेल, तर मग कुठला आमदार तुमच्याकडे थांबेल? असे सवाल रामदास कदम यांनी यावेळी उपस्थित केले.
महिला, कमिशन, संपत्ती… : आमदार अमोल मिटकरींविरुद्ध गंभीर आरोपांची माळ
खरी बेईमानी उद्धव ठाकरे यांनीच केली : रामदास कदम
यापैकी कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. फक्त गद्दार, खोके घेतले म्हणायचे, पण खरी बेईमानी उद्धव ठाकरे यांनीच केली. खेड- दापोलीचे आमदार आणि माझा चिरंजीव योगेश कदम याला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा निर्णय अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरे यांनीच घेतला, असा आरोपही रामदास कदम यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना कदम यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, यावर्षीचा गणेशोत्सव कोणतेही विघ्न न येता साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आमचे आहे, ही भावना लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. आताचे सरकार अतिशय चांगले निर्णय घेत आहे. पोलिसांच्या घराबाबतचा निर्णय हा मोठा निर्णय आहे, आधीच्या सरकारला हे जमले नाही. हे निर्णय पाहिल्यानंतर लक्षात येते की सरकार कशा पद्धतीने चालू शकते. आमचे उद्धवजी मुख्यमंत्री होते, अडीच वर्षात केवळ 3 वेळा मंत्रालयात आले. पण अजितदादा सकाळपासून रात्रीपर्यंत मंत्रालयात बसायचे, त्यांनी छानपैकी आपला पक्ष वाढवण्याचे काम केले, अशी पोचपावतीही कदम यांनी दिली.
शिंदे गट आदित्य ठाकरेंना युवा सेना प्रमुख पदावरून हटवणार?; एकनाथ शिंदेंकडे खासदाराने केली मागणी
एकनाथ शिंदे यांनी जर निर्णय घेतला नसता तर बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण संपली असती, असे मत व्यक्त करत कदम म्हणाले, अजितदादांना मी दोष देणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केले. आमचाच माणूस कमी पडला तर इतरांना दोष काय द्यायचा हे वास्तव आहे. जे झाले ते सर्व जोडण्याच माझ्या डोक्यात होते, पण आता उद्धवजी, आदित्यजी यांची जी काही वक्तव्य चालली आहेत, त्यावरून त्यांना कोणाची काही आवश्यकता नाही. त्यांनाच काही गरज नसेल तर मला काही पडलेली नाही. त्यांनाच पक्ष संपवायचा आहे, तेच पक्षाच्या मुळावर उठलेत, ज्याला कावीळ होते त्याला सगळेच पिवळं दिसते, अशीही टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT