एकीकडे राज्यसभेच्या मतदानाची जोरदार तयारी सुरू असताना विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाल्याचं समोर येतं आहे. पहिल नाव आहे ते म्हणजे सचिन अहिर यांचं तर दुसरं नाव आहे आमशा पडाडवी यांच. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन नावांना संधी मिळू शकते. असं झालं तर सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार असंही बोललं जातं आहे.
ADVERTISEMENT
विधानपरिषदेची निवडणूक जवळ आलेली असताना सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी दिल्याचं निश्चित मानलं जातं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सचिन आहिर शिवसेनेत आले. आदित्य ठाकरे यांना निवडून देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. ज्यानंतर आदित्य ठाकरे निवडूनही आले. सचिन आहिर यांचं पुनर्वसन करणं बाकी होतं ते या निमित्ताने केलं जातं आहे असं बोललं जातं आहे.
शिवसेना: ‘सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं मला वाईट वाटलं’, रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद
आमशा पाडवी कोण आहेत?
कट्टर शिवसैनिक अशी आमशा पाडवी यांची ओळख आहे. धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निडणूक लढवली होती. पण काँग्रेसचे नेते के.सी. पाडवी यांच्याकडून त्यांचा २ हजार ९६ मतांनी पराभव झाला. आज त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे असं सांगितलं जातं आहे. आमशा पडवी यांनी नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी काम केलं आहे. तसंच ग्रामीण भागातला एक चांगला चेहरा म्हणून मागच्या ३० वर्षांपासून जास्त काळ त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकाला पुढे आणण्याचं काम केलं आहे अशी चर्चा आहे.
सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार?
या दोघांना तिकीट दिलं तर एक मात्र नक्की आहे की सुभाष देसाई यांचा पत्ता कट होणार आहे. सुभाष देसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि ज्येष्ठ नेते मानले जातात. शिवसेनेच्या राजकारणात उद्धव ठाकरे उतरले तेव्हापासून सुभाष देसाई हे त्यांचे समर्थक आहेत. एवढंच काय नारायण राणे, राज ठाकरे हे जेव्हा उद्धव ठाकरे निकटवर्तीयांचं ऐकतात, त्यांचे कान काही लोकांनी भरवले आहेत असं सांगितलं होतं. हा सरळ सरळ रोख सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडेच होता.
सुभाष देसाई हे असे राजकारणी आहेत जे राजकारणात जेवढे मुरलेले आहेत तेवढेच शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणातही मुरलेले आहेत. त्यामुळे त्यांना जरी रिटायर्ड केलं जात असलं तरीही त्यांचं महत्त्व कमी होणार नाही याची काळजी ते निश्चितच घेतील. जुन्या फळीतले एकमेव नेते सध्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आहेत. जर सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना विधानपरिषदेसाठी निवडलं गेलं तर सहा महिन्यात सुभाष देसाईचं मंत्रिपद जाईल. असं झालं तर संजय राठोड यांचं वनमंत्रीपद आणि सुभाष देसाई यांचं उद्योग खातं रिकामं होईल. मग मंत्रिमंडळ विस्तार होईल या दोन पदांच आमिष पक्षातल्या इतरांना दाखवता येऊ शकतं. असं असलं तरीही जोपर्यंत नावं निश्चित होत नाहीत तोपर्यंत हे सगळं असंच घडेल हे सांगता येत नाही.
ADVERTISEMENT